करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना अधिक धोका असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. ही गोष्ट विचारात घेऊन पश्चिम बंगालमध्ये ज्या महिलांना १२ वर्षे वयापर्यंतची मुले आहेत, त्यांचं लसीकरण प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबद्दलची घोषणा काल केली.

त्यांनी हेही सांगितलं की राज्यात गुरुवारपासून दररोज किमान चार लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात येईल. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही सध्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला. त्यामुळे ज्या महिलांना १२ वर्षांपर्यंतची मुले आहेत, त्यांचं लसीकरण प्राधान्याने करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. जेणेकरुन आईकडून मुलांना संसर्ग होणार नाही.

हेही वाचा- लशींसाठी पंतप्रधानांचे जाहीर आभार माना!

राज्यातल्या सरकारी तसंच खासगी रुग्णालयांमध्ये महिलांसाठी किमान २६००० राखीव कोविड बेड्सची व्यवस्था करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. तर ९० दिवस ते १२ वर्षे वयोगटातल्या लहान मुलांसाठी साधारणपणे १०००० बेड्सची सोय करण्यात आली आहे. तर नवजात करोनाबाधित बालकांसाठी वेगळा विभागही तयार करण्यात आला आहे.

आणखी वाचा- लस नसल्याने तरुणांची उपेक्षा सुरूच

काल पश्चिम बंगालमध्ये ३८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातल्या मृतांचा आकडा आता १७ हजार ४७५ वर पोहोचला आहे. तर १ हजार ९२५ नव्या बाधितांची नोंद काल दिवसभरात झाली आहे.