इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यांसाठी सुरक्षाव्यवस्था देता येणार नसल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. देशात पुढील दोन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्व सुरक्षाव्यवस्था तैनात करावी लागणार असल्यामुळे आयपीएल सामन्यांसाठी सुरक्षाव्यवस्था देता येणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
सुरक्षाव्यवस्था पुरविता येणार नाही, असे आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवले असून, आमची सर्व सुरक्षाव्यवस्था लोकसभा निवडणुकीसाठी तैनात राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होऊन मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम चालण्याची शक्यता आहे. या निवडणुका झाल्यानंतरच केंद्र सरकार आयपीएलला सुरक्षा पुरविण्यासंदर्भात विचार करू शकेल, असे शिंदे यांनी सांगितले.