जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुकीत लागलेले निकाल हे प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी जोपर्यंत काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम पुन्हा लागू केलं जात नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही असं जाहीर केलं आहे. त्या एनडीटीव्हीशी बोलत होत्या.

“जिथपर्यंत विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आहे. जोपर्यंत ३७० कलम पुन्हा आणलं जात नाही, जोपर्यंत जम्मू काश्मीरची राज्यघटना परत आणली जात नाही मी कोणतीही निवडणूक लढणार नाही,” असं मेहबुबा मुफ्ती यांनी जाहीर केलं आहे.

काश्मीरमध्ये कमळ फुललं; जम्मूमध्ये भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष

मेहबुबा मुफ्ती यांना नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीत झालेल्या गुपकर आघाडीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. निवडणुकीसाठी राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने हातमिळवणी केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यावर त्यांनी आपण ३७० कलम पुन्हा लागू होत नाही तोवर निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं.

“आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत, पण जम्मू काश्मीरच्या भल्यासाठी एकत्र येऊ शकतो. अखेर दिवसाच्या शेवटी आम्ही काश्मिरी आहोत. आम्ही फक्त निवडणुकांबद्दल बोलत नसून जम्मू काश्मीरच्या हिताची चर्चा करत आहोत. जे हरवलं ते पुन्हा आणण्यासंबंधी बोलत आहोत,” असं मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं आहे. “जेव्हा कधी विधानसभा निवडणूक होणार असतील तेव्हा आम्ही एकत्र बसून मुख्यमंत्रीदासंबंधी चर्चा करु. पण मी स्पर्धेत नाही,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.