आयपीएलच्या हंगामात अनेक खेळाडू आपला ठसा उमटवत आहेत. या खेळाडूंमध्ये अनेक खेळाडू हे विदेशातीलही आहेत. सध्या या विदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू म्हणजे अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाताविरुद्ध काल झालेल्या बाद फेरीतील सामन्यात रशीद खानने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात आपली कमाल दाखवली. त्याने २ चौकार आणि ४ षटकारांसह १० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. तसेच १९ धावांत ३ गडी बाद केले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीने चाहत्यांना तर प्रभावित केलेच. पण अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनीही त्याचे तोंडभरून कौतुक केले.

घनी यांनी ट्विट करून रशिदची प्रशंसा केली. ‘रशीद हा आमचा हिरो आहे. सर्व देशवासीयांना त्याचा अभिमान आहे. त्याला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या भारतीय मित्रांचे आभार!, असे घनी यांनी ट्विट केले आहे.

याच ट्विटमध्ये ते पुढे म्हणाले आहेत की अफगाणिस्तान कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, हे रशीदने आम्हाला पुन्हा दाखवून दिले. तो क्रिकेट जगतात नक्कीच मोलाचे योगदान देईल, याची मला खात्री आहे. मात्र, भारताचे पंतप्रधान मोदी यांना मी सांगू इच्छितो की आम्ही आमचा रशीद तुम्हाला देणार नाही. दरम्यान, पंतप्रधान यांनी यावर अद्याप उत्तर दिलेले नाही.

रशीद खानने यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. सर्वाधिक बळी टिपणाऱ्यांच्या यादीत रशीद २१ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंतिम सामन्यात ४ गडी टिपून पहिल्या क्रमांकावर जाण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wont give away rashid khan says ashraf ghani to pm modi
First published on: 26-05-2018 at 16:13 IST