पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून सातत्याने टीकास्त्र झेलावे लागणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना या वेळी ज्ञानपीठ विजेते थोर साहित्यिक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांनी लक्ष्य केले आहे. ‘मोदी पंतप्रधान झाले तर लोकांना त्यांच्या हुकूमशाहीपुढे झुकावे लागेल. त्यामुळेच ते पंतप्रधान झाले तर मी या देशात राहणार नाही’, अशी टीका त्यांनी केली आहे.
अनंतमूर्ती यांनी येथील एका कार्यक्रमात मोदींवर टीकास्त्र सोडले. ‘देशाच्या दुर्दैवाने मोदी पंतप्रधानपदी निवडून आलेच तर जनतेला भीतीच्या सावटाखाली राहावे लागेल. पंडित नेहरू, नरसिंह राव यांच्या काळात पंतप्रधानपदाला प्रतिष्ठा तरी होती. मात्र, मोदी पंतप्रधान झाले तर ही प्रतिष्ठा धुळीस मिळेल’, असे अनंतमूर्ती म्हणाले. अनंतमूर्तीच्या या टीकेवर भाजपने जोरदार तोंडसुख घेतले. अनंतमूर्ती हे वातकुक्कुटासारखे आहेत. राजकीय वातावरणानुसार ते भूमिका बदलत असतात. त्यामुळे मोदींवर त्यांनी केलेली टीका त्यांच्या भूमिकेला साजेशीच आहे. त्यांनी खुशाल देश सोडून परांगदा व्हावे, अशी टीका भाजपने केली आहे. भाजपच्या टीकेला अनंतमूर्ती यांनी तात्काळ उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘मी भूतकाळात पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्यावरही टीका केलीच होती. संघाचा हिंदुत्ववाद मला पटत नाही म्हणून त्यांना पोटशूळ उठतो.’