निर्यात होणाऱ्या दुग्धोत्पादनावर १० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. आपल्याकडे साडेतीन लाख टन दूध भुकटी उपलब्ध आहे. याची निर्यात करण्याचा विचार सुरु असून त्यामुळे दुध उत्पादकांना आर्थिक फायदा होईल, मात्र ती तत्काळ निर्यात करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा तुमच्या मागण्यांवर काम सुरु आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.


दुध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदान थेट बँक खात्यात जमा करावे यासाठी राज्यात दुध उत्पादकांचे आंदोलन सुरु आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा दूध पुरवठा तोडण्यासाठी हिंसक ही आंदोलने झाली आहेत. काल सुरु झालेल्या या आंदोलनाचे पडसाद आजही पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारची भुमिका स्पष्ट केली.

बायो इंधन निर्मितीबाबत बोलताना गडकरी म्हणाले, आपले देशांतर्गत शेती उत्पादन सध्या फायद्यात आहे. त्यामुळे आपल्याला आता पीकपद्धती बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन घेण्याची गरज आहे. मक्यातून आपण इथेनॉलची निर्मिती करु शकतो.