फ्रान्समध्ये नव्या कायद्याने खासगी व कार्यालयीन जीवन वेगळे करण्याचा प्रयत्न

स्मार्टफोनवर इंटरनेट वापरता येत असल्याने आता घरी असतानाही लोकांना कार्यालयाचे ईमेल बघावे लागतात, त्यामुळे घर व कार्यालय यात काही फरकच राहात नाही, त्यामुळे फ्रान्समधील कंपन्यांना आता तेथील कामगारांना उद्यापासून (१ जानेवारी)  इंटरनेटपासून दूर राहू देण्याच्या हमीचा अधिकार द्यावा लागणार आहे.

फ्रान्समध्येच नव्हे तर इतर देशांतही कर्मचाऱ्यांना घरीही कंपनीचे ईमेल बघून त्यांना उत्तरे देत बसावी लागतात किंवा त्यावर कृती करावी लागते. १ जानेवारीपासून नवीन रोजगार कायदा कंपन्यांना लागू होत असून, त्यानुसार पन्नासपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्या किंवा संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना स्मार्टफोनवर कंपनीचे ईमेल आले असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार राहील.

डिजिटल साधनांचा अतिवापर हा डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे लोकांना झोप मिळत नाही. नातेसंबंध बिघडतात तसेच अनेक कर्मचारी जेव्हा फोन बंद ठेवतात तेव्हा त्यांना अनिश्चितता वाटत राहते. सतत कामावर या पद्धतीची जी संस्कृती आहे त्याला आळा घालण्यासाठी फ्रान्समध्ये हा नवा कायदा आणला जात आहे.

शिवाय घरून जेव्हा ईमेल बघून काम केले जाते तेव्हा त्याचा ओव्हरटाइमही दिला जात नसतो. या कायद्यामुळे कार्यालयातील ताण व कामे घरात आणण्याच्या अनिष्ट पद्धतीला आळा बसणार आहे.

फ्रान्समधील तज्ज्ञ झेवियर झुनिगो यांनी सांगितले, की कंपन्यांनी हा कायदा कठोरपणे अमलात आणण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांची स्वायत्तता डिजिटल साधनांमुळे गमावू नये. कामगारमंत्री मरियम अल खोमरी यांनी कामाच्या ठिकाणी डिजिटल साधनांच्या वापरामुळे कर्मचाऱ्यांत माहितीचा अतिरेक होत असल्याबाबत अहवाल जाहीर केला होता. आता कर्मचाऱ्यांना घरी असताना त्यांचे स्मार्टफोन बंद ठेवता येतील, त्यामुळे घर व कामाचे ठिकाण यातील फरक कायम राहून खासगी जीवन व नातेसंबंधातील तणाव कमी होतील.

फ्रान्समध्ये ३५ तासांचा आठवडा असला पाहिजे, अशी कामगार संघटनांची मागणी असतानाच त्यांनी या मागणीला व उपाययोजनेला पाठिंबा दिला आहे. डाव्या विचारसरणीच्या ‘लिबरेशन’ या वृत्तपत्राने या निर्णयाचे स्वागत केले आहे. फोक्सव्ॉगन, डॅमलर या जर्मनीच्या कंपन्या व फ्रान्समधील अरिव्हा व अक्सा (विमा कंपनी) यांनी याची अंमलबजावणी आधीच केली आहे.