‘भारत बंद’ असल्यामुळे अंबाला शहर वाहतुकीची बस थांबविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका कामगार नेत्याचा बुधवारी सकाळी बसखाली सापडून बळी गेला. नरेंदरसिंग असे या नेत्याचे नाव आहे. 
नरेंदरसिंग हे मूळात बसचालक आहेत. बुधवारी सकाळी चारच्या सुमारास ते आपल्या काही सहकाऱयासोबत अंबाला बस डेपोमध्ये गेले. शहर वाहतुकीसाठी निघालेली एक बस बंदच्या पार्श्वभूमीवर रोखण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच बसखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. हरियाणा रोडवेज वर्कर्स युनियनचे अध्यक्ष इंदरसिंग भदाना यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
नरेंदरसिंग हे बस थांबविण्याचा प्रयत्न करीत असताना, प्रशासनाने बंद चिरडण्याच्या हेतून ती पुढे रेटली आणि त्यावेळीच ते बसखाली सापडून चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे भदाना यांचे म्हणणे आहे. नरेंदरसिंग हे ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे खजिनदार होते. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या कर्मचाऱयांनी पोलिस उपायुक्तांच्या गाडीची तोडफोड केली. नरेंदरसिंग यांच्या मृत्यू प्रकरणी हरियाणा रोडवेजच्या महाव्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा. त्याशिवाय सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका भदाना यांनी घेतली. कर्मचाऱयांच्या संतप्त प्रतिक्रियेविरुद्ध अंबाला बस डेपोजवळ मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.