नवी दिल्ली : पादत्राणे रचना आणि विकास संस्थेने (एफडीडीआय) कारागिरांना कोल्हापुरी चपला बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले असून त्यांना ग्राहक मिळवून देण्यासाठीही मदत केली जाणार आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतही कोल्हापुरी चपलेचा बाज आता झळकणार आहे.

एफडीडीआय संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून कोल्हापुरी चपला तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोल्हापुरी चपलांना देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून आता कलाकारांना या चपला तयार करण्याचे अधिक प्रगत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कोल्हापुरी चपलांची रचना, रंग यात बदल करण्यात येणार असून त्यामुळे विक्री वाढणार आहे.

या उद्योगात जे युवक कार्यरत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कोल्हापुरी चपलांची विक्री व व्यापार वाढवण्यासाठी सरकारने या चपलांना भौगोलिक ओळख म्हणजे ‘जीआय’ दर्जा दिला आहे. या चपला हाताने तयार केलेल्या व जास्त मजबूत असतात. भौगौलिक ओळख म्हणजे जीआय दर्जा कृषी, नैसर्गिक व उत्पादित वस्तूंना दिला जातो. त्यात हस्तकला व औद्योगिक वस्तूंचाही समावेश आहे. जीआय दर्जामुळे या चपलांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. एकदा जीआय दर्जा दिल्यानंतर ती वस्तू त्याच नावाने पुन्हा कुणी विकू शकत नाही.

कोल्हापुरी चपलांचे उत्पादन सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या महाराष्ट्रातील तर बेळगावी, धारवाड, बागलकोट, विजापूर या कर्नाटकातील जिल्ह्य़ांत केले जाते. या चपला तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्यास अधिक चांगल्या दर्जाच्या चपलांचे उत्पादन करता येईल, अशी मागणी या उद्योगात सध्या कार्यरत असलेल्या कारागिरांनी केली होती.

युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियात या चपलांना मोठी मागणी आहे. मात्र त्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होत नाही. त्यामुळे उत्पादन व दर्जा या दोन्हींचा मेळ साधता आला पाहिजे. अनेक देशांत भारतीय लोक आहेत त्यांच्याकडूनही या चपलांना मागणी आहे.

‘एफडीडीआय’ची स्थापना १९८६ मध्ये व्यापार मंत्रालयाच्या पुढाकाराने झाली होती. त्यात मनुष्यबळाला योग्य ज्ञान व कौशल्ये देण्याचा उद्देश होता. त्यात चपला व इतर उद्योगांतील वस्तूंच्या उत्पादन प्रशिक्षणाचा समावेश होता.

कोल्हापुरी चपलांची निर्यात

   वर्ष                        उत्पन्न

२०२०-२१              ६८.५ लाख रुपये

(एप्रिल ते ऑगस्ट)

२०१९-२०              १.७४ कोटी रुपये

निर्यात होणारे प्रमुख देश

’ ऑस्ट्रेलिया ’ फ्रान्स

’ कोरिया ’ मलेशिया

’ नेपाळ ’ मॉरिशस

’ सिंगापूर ’ दक्षिण  आफ्रिका.

 

आम्ही ‘पायताण’ नावाचे ब्रॅण्ड सुरू केले असून कोल्हापुरी चपलांच्या या उद्योगातील कौशल्ये सुधारण्याची गरज आहे. या चपलांना जागतिक बाजारपेठेत खूप मागणी आहे. सरकारने याबाबत पुढाकार घेतला आहे, पण त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नाही.

– अनुराग कोकितकर, उद्योजक, कोल्हापूर