देशातील युवा पिढीचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असून तो बदलण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी ‘श्री.राम कॉलेज ऑफ कॉमर्स’च्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले. युवा पिढीचा राजाकारणाविषयी नकारात्मक समज असून भ्रष्टाचार, फसवणूक, खोटारडेपणा, दिशाभूल करणे असे विचार राजकारणाप्रती युवांच्या मनात येतात. राजाकारण हा शब्दच त्याची व्याख्या हरवून बसला आहे. ती पुन्हा मिळवून देण्यासाठी आणि राजकारणाचा खरा अर्थ युवांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत असल्याचे राजनाथ यावेळी म्हणाले.

राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याने देशातील युवा पिढीनेही पुढाकार घेऊन राजकारणाकडे सकारात्मक नजरेने पाहावे, असे आवाहन राजनाथ यांनी केले.द्रव पदार्थाचा आकार जसा भांड्याच्या आकारावर अवलंबून असतो त्याचप्रमाणे राजकारणाचा स्वभाव देखील ते ज्यांच्या हातात आहे त्यांच्या स्वभावावर अवलंबून असतो, असे सांगत राजकारणाची प्रतिमा मलिन झाल्यास आधीचे सरकार जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष टोला राजनाथ यांनी यावेळी लगावला.

इन्फोसिस आणि अल-कायदा यांच्यातील साम्य दाखवणाऱया देणाऱया थॉमस फ्रेडमॅन यांच्या विश्लेषणाचे उदाहरण यावेळी राजनाथ यांनी विद्यार्थ्यांना दिले. ते म्हणाले, अल-कायदा आणि इन्फोसिस यांच्यात साम्य असल्याचे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण इन्फोसिस आणि अल-कायदा या दोन्ही संस्थांमध्ये हुशार आणि निर्मितीक्षम युवांचा भरणा आहे. दोघांची स्थापना देखील एकाच काळात झाली. मात्र, दोघांचेही उद्देश वेगवेगळे असल्याने इन्फोसिस प्रतिभावान तरुणांचे प्रतीक मानले जाते. तर, अल-कायदा ही संघटना विध्वंसक कारवायांसाठी दहशतवादी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे प्रतिभा आणि ज्ञान असून चालत नाही. त्याचा तुम्ही कोणत्या उद्देशासाठी उपयोग करता हे देखील महत्त्वाचे आहे. युवा पिढी देशाची मालमत्ता असून त्यांना योग्य संधी निर्माण करून देण्याची गरज आहे. पण मिळालेल्या संधीचा योग्य उद्देशासाठी वापर करणे हे प्रत्येकाच्या हातात आहे.