जनतेच्या स्वप्नांसाठी जगणे हेच माझे ध्येय आहे, माझ्यासह अनेकांनी सरदार सरोवर धरणाचे स्वप्न पाहिले होते. मात्र ते पूर्ण व्हायला अनेक वर्षे लागली. आजच्या घडीला सरदार वल्लभभाई पटेल यांचा आत्मा आपल्या देशाला आशीर्वाद देत असेल यात शंका नाही असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरणाचे लोकार्पण केले. या धरणामुळे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच या मंचावरून पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ‘न्यू इंडिया’चाही नारा दिला.

गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यात मोदी म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सरोवराचे स्वप्न पाहिले होते. वल्लभभाई पटेल हे थोडे जास्त काळ जगले असते तर त्याच वेळी हे धरण तयार झाले असते. आईसमान असलेल्या नर्मदा नदीला आणि त्यावर तयार होणाऱ्या सरदार सरोवर धरणाला आजवर अनंत अडचणींचा सामना करावा लागला. जगातून या धरणाला विरोध झाला. वर्ल्ड बँकेने या धरणाला निधी देण्यास नकार दिला. असे असले तरीही  आम्ही हे धरण पूर्ण करण्याचा निश्चय केला होता, जो आज  पूर्णत्त्वास आला. या प्रकल्पासाठी जेव्हा बँकांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा मंदिरांनी पैसे उभे केले. ही बाब अभिमानाची आहे असेही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

सरदार सरोवराच्या लोकार्पण सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मी जवानांसोबत दिवाळी साजरी करत असे. एकदा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या (बीएसएफ) भेटीसाठी गेलो असता मी पाहिले की, जवानांना लागणारे पाणी शेकडो उंट वाहून आणत होते. ही घटना पाहून माझे हृदय पिळवटून आले. या जवानांना नर्मदेचे पाणी मिळाले पाहिजे याची खूणगाठ मी मनाशी त्याचवेळी बांधली. ज्यादिवशी मी नर्मदेचे पाणी या जवानांपर्यंत पोहचवले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही असेही मोदींनी सांगितले.

सरदार सरोवर प्रकल्पामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे भवितव्य बदलणार आहे. या प्रकल्पामुळे जनतेला जे पाणी मिळणार आहे त्यामुळे कोट्यवधी मातांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी असणार आहेत. मुक्या जनावरांना पाणी मिळणार आहे त्यांचेही आशीर्वाद मिळणार आहेत. ६७ व्या वाढदिवसाच्या दिवशी यापेक्षा आनंदाचा क्षण कोणता असणार? असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे. सरदार सरोवराची निर्मिती लोकसहभागाशिवाय शक्य झाली नसती. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या जनतेचेही नरेंद्र मोदींनी आभार मानले आहेत. इतकेच नाही तर याच दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेही त्यांनी आभार मानले.