हिंदी अथवा इंग्रजी दरोडेपटांमध्ये किमती हिऱ्यांची चोरी चमत्कृतीपूर्ण क्लृप्त्यांसह पाहताना, ते अनमोल हिरे केवळ नाणावलेल्या दरोडेखोरांसाठीच बनले असल्याचे वाटू लागते. वास्तवात चित्रपटांइतक्याच थरारक पद्धतीने हिऱ्यांवरची नेत्रदीपक हातसफाई ब्रसेल्स विमानतळावर घडली. शस्त्रधारी दरोडेखोरांनी ३५० दशलक्ष युरोच्या (४६५ दशलक्ष डॉलर) हिऱ्यांची चोरी विमानतळातील सुरक्षा यंत्रणा भेदून पार पाडल्याचे बेल्जियम सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. जगातील सर्वात मोठी आणि सुरक्षेचे अभेद्यकडे असलेल्या ठिकाणावरून केली गेलेली ही हिरेचोरी मानली जात आहे.   निष्णात चोरांनी झुरिचकडे निघालेल्या विमानात भरल्या जाणारी कंटेनर्स फोडून त्यात असलेले हिरे लांबविले. बेल्जियम पोलिसांनी दरोडय़ाच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी काय चोरी झाले याचा तपशील दिला नाही. याबाबत सविस्तर माहिती घेऊनच काय घडले, हे कळविण्यात येईल, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, एका मिनिटामध्ये हे दरोडानाटय़ संपले. त्यात कुठलाही गोळीबार झाला नाही. मात्र विमानतळाबाहेर एक वाहन जाळून टाकण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

हिरा हैं चोरों के लिए?
जगातील सर्वात मोठी हिरेचोरी असल्याचे अ‍ॅण्टवर्प वर्ल्ड डायमंड सेंटरच्या प्रवक्त्याने सांगितले. कच्च्या अवस्थेत असलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी झुरिच येथे नेण्यात येत होते. आठ दरोडेखोरांनी विमानतळावर हे हिरे विमानात नेणारी कंटेनर्स फोडले. अतिसुरक्षित विभागाची सुरक्षा यंत्रणा त्यांनी कशी निकामी केली, याबाबतचे कोडे अद्याप उकलले नाही. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या बाबीचा तपास करीत आहेत. दरोडेखोरांनी दोन वाहनांमधून विमानतळ परिसरात प्रवेश केला.

बेल्जियमचा हिरेबाजार कसा?
जगातील हिऱ्यांपैकी ८४ टक्के उत्पादन हे अ‍ॅण्टवर्प या बेल्जियममधील भागात होते. कच्च्या हिऱ्यांवर पैलू पाडून त्याला तकाकी देण्याचे काम बेल्जियममध्ये होते. अ‍ॅण्टवर्प जिल्ह्य़ाची उलाढाल ५४ अब्ज डॉलर इतकी डोळे दीपवणारी आहे. दीड हजार हिरे कंपन्या आणि साडेतीन हजारांहून हिरेव्यापारी या भागात आहेत. जगामध्ये होणारा सर्वात मोठा हिरेव्यापार हा येथून नियंत्रित होतो. यात भारतीय व ज्यू हिरेव्यापाऱ्यांचे वर्चस्व अधिक आहे. चित्रपटाहून भयाण अशा दरोडेखोर, हिरेचोर यांची या भागावर म्हणूनच मोठी नजर असते.