‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ असं म्हटलं जातं. सामान्यपणे दोन महिन्यातून एकदा रक्तदान करणे फायद्याचे असते असं म्हटलं जातं. मात्र ऑस्ट्रेलियातील एक व्यक्ती मागील साठ वर्षांपासून दर आठवड्याला रक्तदान करत आहे. या व्यक्तीचे नाव आहे जेम्स हॅरिसन.  काही महिन्यांपूर्वी त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी या रक्तदानाच्या समाजसेवेमधून निवृत्ती घेतली आहे.

वयाच्या २१ व्या वर्षापासून दर आठवड्याला रक्तदान करणाऱ्या हॅरिसन यांना स्थानिक लोक ‘मॅन विथ द गोल्डन आर्म’ म्हणजेच ‘सुवर्ण बाहू असलेला माणूस’ म्हणून ओळखतात. ऑस्ट्रेलियन रेड क्रॉस रक्तपेढीने दिलेल्या माहितीनुसार, हॅरिसनच्या या रक्तदानामुळे मागील साठ वर्षांमध्ये २४ लाख लहान मुलांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

फोटो: द ऑस्ट्रेलियन रेड क्रॉस ब्लड सर्व्हिस

हॅरिसन यांच्या रक्तामध्ये विशेष प्रकारचे गुणधर्म आहेत. त्यांच्या रक्तामधील घटकांचा वापर करुन लहान मुलांना देण्यात येणाऱ्या अॅण्टी-डी या इंजेक्शनमधील प्रतिपिंड (अॅण्टीबायोटिक्स) बनवले जातात. या अॅण्टीबायोटिक्समुळे ठराविक प्रकारचा रक्तगट असणाऱ्या मुलांना होणाऱ्या ‘रीसस’संदर्भातील (रक्तातील आरएच फॅक्टर ज्यावरून ठरतो) आजारांवर उपचार केला जातो. या आजारामध्ये गरोदर स्त्रीच्या रक्तामधील घटक हे जन्माला येणाऱ्या बाळाच्या रक्त पेक्षींना हानी पोहचवतात. या आजारामुळे गर्भात असणाऱ्या बाळांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो किंवा त्याचा गर्भातच मृत्यू होऊ शकतो. ज्यावेळी आईचा रक्तगट आरएच निगेटीव्ह असतो आणि जन्माला येणाऱ्या बाळाचा रक्तगट आरएच पॉझिटीव्ह असतो त्यावेळी बाळाला हा आजार होण्याची शक्यता असते. सामान्यपणे वडिलांच्या जणूकांमधून बाळाच्या रक्तगट ठरतो, त्यामुळेच ही समस्या निर्माण होते.

पहिल्या गर्भधारणेदरम्यान आईचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह रक्तसंक्रमणास अनुरुप केल्यास जन्माला येणाऱ्या बाळाच्या रक्तामधील रक्त पेशी नष्ट करणारी अँटीबॉडीज आईच्या शरिरामध्ये उत्पन्न होतात. अशाप्रकारच्या अँटीबॉडीज बाळासाठी घातक ठरु शकतात.

हॅरिसन यांच्या रक्ताचा फायदा काय

ऑस्ट्रेलियन रेडक्रॉसने दिलेल्या माहितीनुसार हॅरिसनच्या छातीवर वयाच्या १४ व्या वर्षी शस्त्रक्रिया झाली. रक्तदानामुळे हॅरिसन यांचे प्राण वाचल्याने त्यांनी नियमित रक्तदान करण्याचा निर्धार केला. काही वर्षांनंतर डॉक्टरांना हॅरिसन यांच्या रक्तामध्ये विशेष गुणधर्म असल्याचे लक्षात आले. हॅरिसन यांच्या रक्तामधील अॅण्टीबायोटिक्सचा वापर करुन अॅण्टी-डी इंजेक्शनची निर्मिती करता येऊ शकते याची कल्पना डॉक्टरांना आली. तेव्हापासून हॅरिसन हे रक्तदानाच्या माध्यमातून दर आठवड्याला ब्लड प्लाजमा दान करु लागले.

हॅरिसन यांच्या रक्तामध्ये हे विशेष गुणधर्म कशामुळे आले याबद्दल डॉक्टरांना ठामपणे काहीही सांगणे शक्य नसले तरी १४ व्या वर्षी झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना देण्यात आलेल्या रक्तामुळे हे गुणधर्म त्यांच्या रक्तामध्ये निर्माण झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियामधील ५० हून कमी लोकांच्या रक्तामध्ये हा गुणधर्म असल्याचे रेडक्रॉसचे म्हणणे आहे.

रक्तदान करण्यात आलेल्या रक्ताची प्रत्येक पिशवी महत्वाची असते. मात्र हॅरिसन यांचे रक्त जास्त खास आहे. त्यांच्या रक्ताचा वापर करुन लहान मुलांचा जीव वाचवणारे औषध बनवले जाते. हे औषध अशा महिलांना दिले जाते ज्यांच्या रक्तपेक्षी त्यांच्याच गर्भाशयात असणाऱ्या बाळासाठी जीवघेण्या ठरु शकतात. ऑस्ट्रेलियात तयार झालेल्या अॅण्टी-डीची प्रत्येक लस ही हॅरिसनच्या रक्तामधील घटकापासून बनवण्यात आल्याची माहिती रेडक्रॉस ऑस्ट्रेलियाच्या जेमा पॅल्कीमायर यांनी दिली.

हॅरिसन यांच्या रक्तात खास का?

हॅरिसन यांच्या रक्तामधील घटकापासून बनवण्यात आलेल्या अॅण्टी-डी या औषधामुळे आईच्या शरिरामधील रक्तपेक्षी बाळाच्या रक्तपेक्षींना विरोध करणाऱ्या आरएच अॅण्टीबॉडीजची निर्मिती थांबते. त्यामुळे आईचा रक्तगट आरएच निगेटीव्ह असला आणि बाळाचा रक्तगट आरएच पॉझिटीव्ह असला तरी बाळाला कोणताही त्रास होत नाही. १९६७ पासून आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये आरएच निगेटीव्ह रक्तगट असणाऱ्या ३० लाखहून अधिक महिलांना प्रसुतीआधी अॅण्टी-डी औषधांचे डोस देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हॅरिसन यांच्या मुलीच्या जन्माआधी त्यांच्या पत्नीलाही अॅण्टी-डी औषध देण्यात आले होते. ‘मी अशाप्रकारे लोकांना मदत करु शकतोय याचा मला खूप आनंद आहे’, असे हॅरिसन म्हणतात.

१९६७ आधी ऑस्ट्रेलियामध्ये हजारो बाळांचा जन्माआधीच मृत्यू होत असे. मात्र असे का होत आहे याबद्दल डॉक्टरांना याबद्दल काहीच कल्पना नसायची. अनेकदा महिलांचा गर्भपात होत असे. तसेच मेंदूवर परिणाम झालेल्या बाळांच्या जन्माचे प्रमाणही अधिक होते. मात्र यामागील नक्की कारण काय हे तेव्हा डॉक्टरांना कळत नव्हते अशी माहिती पॅल्कीमायर यांनी सीएनएनशी बोलताना दिली. मात्र त्यानंतर अॅण्टी-डीचा शोध लागला. हॅरिसन यांच्या रुपामध्ये जगाला अशाप्रकारचा विशेष गुणधर्म असणारा रक्तदाता ऑस्ट्रेलियानेच पहिल्यांदा दिल्याचे पॅल्कीमायर म्हणतात.

फोटो: तारा डेला/ द ऑस्ट्रेलियन रेड क्रॉस ब्लड/ कॅटर्स न्यूज

ऑस्ट्रेलियामधील २४ लाखाहून अधिक बाळांना हॅरिसन यांच्यामुळे जिवनदान मिळाले आहे. हॅरिसन यांना ऑस्ट्रेलियामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराचाही समावेश आहे. या कामासाठी हॅरिसन यांचे सर्वचजण नेहमीच कौतूक करतात. मात्र ‘रक्तदाता असणे हे माझे एकमेव टॅलेण्ट’ असल्याचे हॅरिसन मस्करीमध्ये म्हणतात.

हॅरिसन आता वयाच्या ८१ व्या वर्षी या रक्तदानाच्या समाजकार्यातून निवृत्त होत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये वयाच्या 81 व्या वर्षानंतर रक्तदान करता येत नाही म्हणून त्यांना यामधून निवृत्ती घ्यावी लागणार आहे. मात्र हॅरिसन यांचे कार्य पाहून अशाप्रकारच्या अॅण्टीबॉडीज रक्तामध्ये असणारे रक्तदाते समोर येतील अशी अपेक्षा ऑस्ट्रेलिया रेडक्रॉसच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.