इराकमध्ये अमेरिकेकडून सुरू असलेल्या हवाई हल्ल्याला विरोध म्हणून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ (आयसिस) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी आणखी एका अमेरिकी पत्रकाराचा शिरच्छेद केला. स्टीव्हन सॉटलॉफ असे या पत्रकाराचे नाव असून, त्याचा शिरच्छेद करत असल्याची चित्रफीत या संघटनेने मंगळवारी प्रसारित केली. संयुक्त राष्ट्रांसह विविध देशांनी या हत्येचा तीव्र निषेध केला आहे.
या संघटनेच्या दहशतवाद्यांनी यापूर्वी जेम्स फॉली या अमेरिकी पत्रकाराची अशीच क्रूर हत्या करून त्याची चित्रफीत प्रसिद्ध केली होती. सॉटलॉफ हे आयसिसच्या क्रूरतेला बळी पडलेले दुसरे पत्रकार आहेत.
काही दिवसांपूर्वीच या दहशतवाद्यांनी सॉटलॉफ यांचे अपहरण केले होते. सॉटलॉफ यांना जीवदान मिळावे यासाठी त्यांच्या आईने आयसिसला विनंती केली होती. सॉटलॉफ हे मूळचे मियामीचे असून, टाइम आणि फॉरेन पॉलिसी या नियतकालिकांसाठी ते मुक्त पत्रकार म्हणून काम पाहत होते.
अमेरिका, ब्रिटनकडून निषेध
‘आयसिस’ने केलेल्या या राक्षसी कृत्याचा अमेरिका, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी परिस्थितीचा विचार करण्यासाठी मंत्रिमंडळाची बठक बुधवारी घेतली. ही चित्रफीत खरी आहे की नाही हे पाहणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी अशा प्रकारे निरपराध अमेरिकी नागरिकांचा जीव घेणे योग्य नाही. काही अमेरिकी नागरिक अजूनही सीरियात आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एका २६ वर्षांच्या महिलेचे अपहरण करण्यात आले आहे. ती मानवतावादी कार्य करण्यासाठी तेथे गेली होती, असेही त्यांनी सांगितले.
चित्रफीत खरीच!
दहशतवाद्यांनी प्रसारित केलेली दृश्यचित्रफीत खरी असल्याचा निर्वाळा अमेरिकी गुप्तचरांनी दिला आहे. ही चित्रफीत खरी असल्याबद्दल संशय घेण्यात आला होता. त्यामुळे हे काम गुप्तचरांकडे सोपविले होते. सॉटलॉफ यांच्या कुटुंबीयांनीही या चित्रफीतीतील व्यक्ती सॉटलॉफच असल्याचे सांगून शोक व्यक्त केला.