लार्ज हैड्रॉन कोलायडरमध्ये शिशाच्या अणुकेंद्रकांची उच्च ऊर्जेने टक्कर
विश्वनिर्मितीच्यावेळी जे मिश्रण तयार झाले होते तसेच द्रव मिश्रण (प्रीमॉर्डियल सूप) वैज्ञानिकांनी लार्ज हैड्रॉन कोलायडर या यंत्रात उच्च शक्तीने शिशाचे अणु एकमेकांवर आदळवून छोटय़ा प्रमाणात तयार केले आहे. युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रीसर्च म्हणजेच ‘सर्न’ या संस्थेच्या एलएचसी (लार्ज हैड्रॉन कोलायडर )यंत्राच्या मदतीने हे मिश्रण तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.
विश्वनिर्मिती अगोदरचे हे मिश्रण क्वार्क-ग्लुऑन आयनद्रायुचे (प्लाझ्मा) असून डेन्मार्कमधील नील्स बोर संस्थेच्या संशोधकांनी तयार केले असून त्यात द्रवाचे गुणधर्म अधिक अचूकतेने मोजण्यात आले. विश्वाच्या निर्मितीनंतर काही अब्जांश सेकंदाला विश्वाची जी स्थिती होती ती उकळत्या व दाट मिश्रणासारखी होती, हे मिश्रण मूलभूत कणांचे म्हणजे बहुतांश क्वार्क व ग्लुऑनचे होते. या स्थितीला क्वार्क-ग्लुऑन प्लाझ्मा असे म्हणतात. जीनिव्हातील सर्न संस्थेच्या प्रयोगात २७ कि.मी. लांब असलेल्या लार्ज हैड्रॉन कोलायडरमध्ये हे मिश्रण तयार करण्यात आले. त्यात ५.०२ ट्रिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट इतक्या उच्च ऊर्जेची शिशाची अणुकेंद्रके एकमेकांवर आदळवण्यात आली. सर्नच्या अलाइस या कण शोधकात विश्वाच्या निर्मितीवेळचे मिश्रण तयार करण्यात आले व त्याचे गुणधर्म तपासण्यात आले.
अलाइस संशोधक गटातील नील्स बोर संस्थेचे यू झो यांनी सांगितले की, शिशाची अणुकेंद्रके एकमेकांवर आदळवण्यात प्रथमच यश आले असून क्वार्क-ग्लुऑन प्लाझ्मा मिश्रणाचे गुणधर्म अचूक तपासण्यात आले आहेत.
या प्रयोगातील आंतरराष्ट्रीय चमूचे नेतृत्व त्यांनी केली. शिशाच्या आयनांच्या टकरीनंतर क्वार्क-ग्लुऑन प्लाझ्मा कसा तयार होतो व वाहतो याचे संशोधन यात केले आहे. क्वार्क-ग्लुऑन प्लाझ्माचे संकलित द्रव गुणधर्म तपासण्यावर यात भर देण्यात आला. त्यात द्रव्याची अवस्था वायूपेक्षा जास्त द्रव असते, विशेष म्हणजे जास्त ऊर्जा घनता असतानाही हे घडून येते.