आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यमुना नदीकाठी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या ‘वर्ल्ड कल्चरल फेस्टिव्हल’ या सांस्कृतिक महासोहळ्याच्या आयोजनामुळे यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्राची गंभीर हानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार सोहळ्यासाठी वापरण्यात आलेले यमुनेचे पूरप्रवण क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. यामुळे जैवविविधतेचे अदृश्य नुकसान झाले असून ही हानी कधीही भरून न येणारी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सात तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेला हा अहवाला २८ जुलै रोजी राष्ट्रीय हरित लवादाकडे सुपूर्द करण्यात आला होता.
यमुनाजळी खेळू खेळ..
मुख्य सोहळ्यासाठी डीएनडी पूल आणि बारापुल्ला ड्रेन यादरम्यानचा परिसर वापरण्यात आला होता. या संपूर्ण परिसराचे थोडेथोडके नव्हे तर संपूर्ण नुकसान झाले आहे. सध्या याठिकाणची जमीन पूर्णपणे सपाट आणि टणक झाली आहे. तसेच या भागातील जलसाठा रिक्त झाला असून काही भाग वगळता येथील वनस्पती नष्ट झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. याशिवाय, तज्ज्ञ समितीचे सदस्य या परिसराची पाहणी आणि निरीक्षण करण्यासाठी गेले असताना  आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना मज्जाव करण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीला सॅटेलाईटद्वारे या परिसराचा अभ्यास करावा लागला. याविषयी आर्ट ऑफ लिव्हिंगशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून समितीची फेररचना करण्याची जुनी मागणी पुन्हा एकदा रेटण्यात आली.
यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजित केलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम हरित निकषांचे उल्लंघन केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले होते. या सोहळ्यासाठी यमुनेच्या एक हजार एकरांच्या पूरप्रवण क्षेत्रात ३५ हजार कलावंत मावतील एवढे भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले होते.  ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेला ३५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वेळ पडली तर तुरुंगात जाऊ, पण रुपयाचाही दंड भरणार नाही – श्री श्री रविशंकर