भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी जगभरात अविश्वासाचे वातावरण आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात त्यांचा भाजपकडून उदोउदो केला जात असल्याची टीका ‘द गार्डियन’ या ब्रिटीश वृत्तपत्रातून करण्यात आली आहे. या वृत्ताचा आधार घेत काँग्रेसने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर तोफ डागली आहे. ‘द गार्डियन’ वृत्तपत्राच्या ७ एप्रिल रोजीच्या अंकात भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाविषयी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा असणारे गुजरात राज्याच्या विकास प्रारूपाविषयी ब्रिटीश वृत्तपत्रातून साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच गुजरातमधील गोध्रा दंगलीच्या कारणावरून जगभरात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाविषयी अविश्वास असल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे.