चीनमधील करोना विषाणू संसर्गाने घेतलेल्या बळींची संख्या आता २३४५ झाली असून शुक्रवारी १०९ जणांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेचे पथक तेथे या विषाणूबाबत आणखी माहिती घेत आहे. त्यांनी वुहान शहराला शनिवारी भेट देऊन पाहणी केली. एकूण ७६,२८८ जणांना या विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सीओव्हीआयडी १९ विषाणूचे ३९७ नवीन रुग्ण शुक्रवारी सापडले असून ३१ प्रांतात १०९ बळी गेले आहेत. शुक्रवार अखेरीस मृतांची एकूण संख्या २३४५ झाली असून  दिवसभरातील मृतात १०६ हुबेईचे आहेत. हेबेई, शांघाय, शिनजियांग येथे प्रत्येकी एक बळी गेला आहे. हुबेई प्रांतात  ३६६ निश्चित रुग्ण सापडले आहेत. हुबेई प्रांतात एकूण ६३,४५४ निश्चित रुग्ण आहेत. चीनमध्ये एकूण २०,६५९ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी जीनिव्हात सांगितले की, आमचे पथक चीनमध्ये करोना विषाणू संसर्गाबाबत माहिती घेत आहे. १२ सदस्यांचे पथक वुहानला आले असून त्यांना चीन सरकारने आतापर्यंत रोखून ठेवले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकात अमेरिकेच्या तज्ञांचा समावेश आहे.

नवा कोरोना विषाणू तुरुंगामधून पसरल्याबाबत अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. हुबेई व वुहान येथे विषाणू विरोधातील लढाई धैर्याने लढली पाहिजे, तेथील परिस्थिती आटोक्यात आणली पाहिजे,  असे जिनपिंग यांनी म्हटल्याचे साउथ चायना मॉर्निंग पोस्टने  स्पष्ट केले आहे. चीनमधील पाच तुरुंगात विषाणूचा प्रसार झाला आहे . हुबेई, शाँगडाँग व झेजियांग प्रांतातील तुरुंगात ४४७ रुग्ण सापडले आहेत.

इराणमध्ये करोनाचा पाचवा बळी

तेहरान : इराणमध्ये करोना विषाणू संसर्गाने पाचवा बळी घेतला असून एकूण २८ जणांना विषाणूची लागण झाली आहे. इराणमध्ये १० नवीन रुग्ण सापडले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला. चार शहरात विषाणूग्रस्त लोकांवर उपचार सुरू असून त्यात तेहरानचा समावेश आहे.  तेथे अनेक दुकानांमध्ये मास्क व हँड सॅनिटायझर संपले आहेत. कोम, अराक व राश्त या ठिकाणीही या विषाणूचे रुग्ण आहेत. इराणधील शुक्रवारच्या संसदीय निवडणुकीवर विषाणूचे सावट होते. अनेक मतदारांनी मास्क लावून मतदान केले. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते किनौश जहानपौर यांनी सांगितले की, विषाणूने ५ बळी घेतले आहेत.