वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले असून सुरक्षा, व्यापार, हवामान बदल या महत्त्वाच्या सामुदायिक अग्रक्रमाच्या विषयांवर मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडो यांनी सांगितले, अमेरिकेशी कॅनडाचे निकटचे संबंध आहेतच,  भौगौलिक स्थिती व व्यक्तिगत संबंध यामुळे दोन्ही देशांत आर्थिक संबंध मजबूत आहेत. कोविड १९ साथीचा मुकाबला, शांतता व सर्वसमावेशकता, आर्थिक भरभराट, हवामान बदल या मुद्दय़ांवर नवीन प्रशासनाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. हे दोन्ही  देश एकत्रितपणे जागतिक आव्हानांना तोंड देतील.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले, अमेरिका हा आमचा महत्त्वाचा मित्र देश आहे. सामुदायिक अग्रक्रमांच्या मुद्दय़ांवर आम्ही काम करू. त्यात हवामान बदल, व्यापार व सुरक्षा यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बायडेन यांच्याकडून नव्या भागीदारीची अपेक्षा व्यक्त केली असून नवीन अध्यक्षांची निवड ही अमेरिकेसाठीच नव्हे तर आमच्यासाठीही महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी अमेरिकेशी भागीदारी मजबूत करण्याची इच्छा व्यक्त करताना म्हटले आहे की, दोन्ही देशांतील संबंध मजबूत आहेत. बायडेन यांच्यासमवेत काम करण्यास आम्हाला आवडेल.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आजची आव्हाने पेलण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येऊन  बरेच काही करावे लागेल, असे म्हटले आहे.

जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी बायडेन-हॅरिस प्रशासनासमवेत जपान-अमेरिका आघाडी आणखी मजबूत व्हावी तसेच  इंडो-पॅसिफक भागात शांतता, स्वातंत्र्याबरोबरच भरभराट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल, बेल्जियमचे पंतप्रधान अ‍ॅलेक्झांडर डी क्रू, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इराकचे अध्यक्ष बरहाम सलिह, संयुक्त अरब अमिरातींचे युवराज महंमद बिन झायेद अल नहया व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बायडेन व हॅरिस यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

इस्रायलच्या पंतप्रधानांकडून ट्रम्प यांनाही श्रेय

बायडेन यांच्याशी चाळीस वर्षांपासून व्यक्तिगत संबंध असल्याचे सांगून इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी बायडेन-हॅरीस प्रशासनाकडून अमेरिका-इस्रायल आघाडी बळकट करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नेत्यानाहू यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही आभार मानले असून त्यांच्याशीही व्यक्तिगत संबंध होते असे म्हटले आहे. जेरूसलेमला मान्यता मिळवून देण्याचे मोठे काम ट्रम्प यांनी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अणुकरारात अमेरिकेने पुन्हा सहभागी व्हावे :इराणच्या अध्यक्षांचे बायडेन यांना आवाहन

तेहरान : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी पूर्वीच्या चुकांची दुरुस्ती करावी आणि इराणने २०१५ मध्ये जागतिक शक्तींबरोबर केलेल्या अणुकरारामध्ये अमेरिकेला सहभागी करावे, असे आवाहन इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी केले असल्याचे वृत्त रविवारी एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

अमेरिकेच्या पुढील प्रशासनाला पूर्वी केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची संधी चालून आली आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय निकषांचा आदर करून अमेरिकेने करारामध्ये सहभागी व्हावे, असे रौहानी यांच्या हवाल्याने आयआरएनए या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला होता.