पहिल्या दिवशी शिवसेनेचा वरचष्मा, तर अखेरचा दिवस भाजपचा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय आणि पाश्चात्त्य संस्कृतीतील भेद दोन शब्द दोन संस्कृती या लेखनाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रेखाटले आहेत. मात्र त्यांच्या स्मृतींना समíपत विश्व साहित्य संमेलनातील दोन दिवस दोन पक्षांमध्ये वाटले गेले. शनिवारी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा वरचष्मा होता, तर दुसरा दिवस भाजपसाठी राखून ठेवला, असेच उपस्थितांना जाणवले.
संमेलनासाठी २५ लाख रुपयांची देणगी देणारे खासदार राहुल शेवाळे स्वागताध्यक्ष झाले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संमेलनाचे उद्घाटक असावेत हा त्यांचा हट्ट मान्य झाला. अंदमानमध्ये निवडणुकीची आचारससंहिता लागू असल्यामुळे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि अंदमान-निकोबारचे उपराज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) ए. के. सिंह अनुपस्थित होते. समारोपाला व्यासपीठावर कोणीही राजकीय व्यक्ती नव्हती. संमेलनात रविवारी भारतीय जनता पक्षाचे अमरावती येथील जिल्हाध्यक्ष शिवराय कुलकर्णी, रत्नागिरी येथील बाबा परुळेकर यांचा सहभाग होता. सामाजिक समरसता मंचाचे दादा इदाते यांचे भाषण झाले. तर समारोपाच्या सत्रात अंदमान-निकोबारचे खासदार विष्णूपद रे यांच्या पत्नीने हजेरी लावली. युतीतील दोन पक्षांमध्ये सत्तेप्रमाणेच हे संमेलनही वाटले गेले.
‘समाज सुधारणेसाठी
विज्ञाननिष्ठा रुजणे गरजेचे’
समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी डोळस विवेकाचा आधार घेत विज्ञाननिष्ठा रुजणे गरजेचे असल्याचा सूर समाज सुधारणा आणि विज्ञाननिष्ठा या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त झाला. शिवराय कुलकर्णी, बाबा परुळेकर, जयंत कुलकर्णी आणि रामचंद्र साळुंके यांचा चर्चासत्रात सहभाग होता. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. धर्माधिकारी म्हणाले, डावे आणि उजवे ही परिभाषा उपयोगाची नाही. डावे आपल्याला मानवतावादी आणि जागतिक विचारांचे समजतात. तर रुढार्थाने उजवे लोक जातिव्यवस्थेचे जोखड तोडून नवा समाज घडविण्याकडे दुर्लक्ष करतात.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली
भंपकपणाला थारा नको!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भंपकपणाला थारा मिळता कामा नये, असा सूर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरील परिसंवादात व्यक्त झाला. विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर झालेल्या परिसंवादात प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल आणि प्रसिद्ध कथाकार आसाराम लोमटे यांचा सहभाग होता. प्रा. उषा तांबे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होत्या. रविमुकुल म्हणाले, दडपल्या जाणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करणे हे केवळ साहित्यिक-कलावंतांचे नाही तर सुबुद्ध नागरिकांचेही काम आहे. आपल्याकडे बंडखोर विचारवंतांची परंपरा आहे. मात्र, चित्र हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे हे आपण कधी ध्यानात घेतलेच नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पहिला घाला चित्रावरच येतो. लोमटे म्हणाले, समाजाला हादरे देण्याचे आणि प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणारी अभिव्यक्ती महत्त्वाची ठरते. ही अभिव्यक्ती सहजासहजी किंवा सुखासुखी होत नसते. त्यासाठी कलाकाराला प्रसंगी प्राण गमावण्याची जोखीम पत्करावी लागते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World literature festival at andaman
First published on: 07-09-2015 at 05:13 IST