फिलिपाइन्सला तडाखा दिलेल्या हैयान चक्रीवादळाने १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांनी वर्तवली आहे.
   चक्रीवादळाने अनेक इमारती, घरे जमीनदोस्त झाल्याने या देशातील तब्बल सहा लाख ६० हजार नागरिक बेघर झाले आहेत. त्यामुळे या देशाला अन्य देशांनी मदत करावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी जॉन गिंग यांनी केले आहे.
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पूर्व फिलिपाइन्समध्ये अनेक ठिकाणी मृतदेहांचा खच पडलेला आहे. ही संख्या निश्चित १० हजारांपेक्षा जास्त असावी. संयुक्त राष्ट्रांचे या देशातील परिस्थितीवर लक्ष असून, त्यांना अधिकाधिक मदत पुरवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे गिंग यांनी सांगितले.
दरम्यान, फिलिपाइन्समध्ये मृतदेहांची अधिकृत संख्या १७४४ झाली आहे, अशी माहिती फिलिपाइन्स सरकारने दिली. मृतांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मृतांची संख्या १० हजारांपेक्षा अधिक जाण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या शक्यतेलाही त्यांनी दुजोरा दिला.