नवी दिल्ली : भारत दोन लशींसह नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी सज्ज असून आमच्या या सर्वात मोठय़ा लसीकरण कार्यक्रमाकडे जगाचे लक्ष आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. १६ व्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. जर कुठे खरी लोकशाही जिवंत असेल, तर ती भारतात, असेही मोदी या वेळी म्हणाले.

जगाची ‘फार्मसी’ म्हणून भारताने नावलौकिक मिळवला आहे. जगाला आवश्यक असलेली अनेक औषधे भारताने पुरवली आहेत. अजूनही पुरवत आहे. आता जग भारतात लसीकरणाचा सर्वात मोठा कार्यक्रम कसा, राबवला जातो याची प्रतीक्षा करीत आहे, असे मोदी म्हणाले.

करोनासाथीच्या काळात भारतीय लोकांनी त्यांच्या क्षमता दाखवतानाच एकजुटीने या संकटाचा सामना केला. भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी थेट निधी हस्तांतराचा वापर केला जात असून थेट लाभार्थीच्या नावावर पैसे जमा होत आहेत. आज जग इंटरनेटने जोडले गेलेले असून आमची मने मात्र भारतमातेशी जोडली गेली आहेत. अनेक राष्ट्रप्रमुखांशी माझी चर्चा झाली. त्यांनी भारताने कोविड काळात जगाला मदतीचा हात दिल्याचे कौतुक केले. भारताने या काळात वेगळ्या पद्धतीने धुरीणत्व पार पाडले. हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे, असे त्यांनी सांगितले.

परदेशातील भारतीयांनीही करोनाचा सामना करण्यात भारताला मदत केली, त्याबद्दल ते प्रशंसेस पात्र आहेत. सरकारने वंदे भारत मोहिमेअंतर्गत करोनाकाळात परदेशात अडकून पडलेल्या ४५ लाख लोकांना भारतात आणले, अशी माहिती त्यांनी दिली.