राजधानी दिल्लीत करोनाचा वाढता प्रभाव पाहता संकटाचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली जात आहे. दिल्ली सरकारने राजधानीत जगातील सर्वात मोठं तात्पुरतं कोविड सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे. राधा सोमी अध्यात्मिक केंद्रात हे आरोग्य केंद्र उभारलं जात आहे. या ठिकाणी १० हजार बेडची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. छत्तरपूर येथे उभारण्यात येत असलेलं कोविड सेंटर १२ लाख ५० हजार स्क्वेअर फूट परिसर व्यापणार आहे. हे सेंटर जवळपास २२ फुटबॉल मैदानांइतकं मोठं असणार आहे. या ठिकाणी पंखे तसंच सीसीटीव्हीची व्यवस्था असणार आहे. या ठिकाणी तीन लाख लोक प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित असतात. भव्य असल्यानेच ही जागा कोविड सेंटर उभारण्यासाठी निवडण्यात आलं आहे.

या ठिकाणी आधी स्थलांतरितांना आश्रय देण्यात आला होता. याशिवाय एकाच वेळी हजारो लोकांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आहे अशी माहिती आध्यात्मिक केंद्राचे विक्रम सेठी यांनी दिली आहे. दक्षिण दिल्लीचे जिल्हा दंडाधिकारी सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोग्य मंत्रालयाच्या सर्व गाइडलाइन्स लक्षात घेऊनच काम केलं जात आहे. याठिकाणी जवळपास २० मिनी हॉस्पिटल्स असतील आणि प्रत्येक ठिकाणी ५०० बेड असतील. १० टक्के बेड्सना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असेल. या ठिकाणी ४०० डॉक्टर्स शिफ्टमध्ये काम करतील”.

विशेष बाब म्हणजे या ठिकाणी पुठ्ठ्यांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले बेड वापरण्यात येणार आहेत. हे बेड सॅनिटाइज करण्याची गरज नाही, पण हवं तर करु शकतो. तसंत त्यांचा पुनर्वापर करणंही शक्य आहे. “पुठ्ठ्यावर करोनाचे विषाणू २४ तासांपेक्षा जास्त काळ टिकत नाही यामुळे ते सॅनिटाइज करण्याची गरज नाही. लोखंड, प्लास्टिक आणि लाकडावर करोनाचा विषाणी जवळपास पाच दिवस राहू शकतो. हे बेड अत्यंत हलके असून तो उभा करणं तसंच उघडणं सहज आहे. हे बेड करोना रुग्णांसाठी पाठवणे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असं बेडचा पुरवठा करणारे धवन बॉक्स शीट कंटनर्स प्रायव्हेड लिमिटेडचे विक्रम धवन यांनी सांगितलं आहे.

कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी याठिकाणी अत्याधुनिक सेवा देण्यावर भर असून लष्कर तसंच निमलष्कर दलाची मदत घेतली जाणार आहे. ३० जूनपर्यंत हे सेंटर उभं राहावं यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे.