चीनच्या झांगजीयाजी दरीवर असणारा काचेचा पूल  अवघ्या दोन आठवड्यात बंद करण्याची वेळ हा पूल बांधणा-या कंपनीवर आली आहे. हा जगातील सगळ्यात लांब आणि सर्वाधिक उंचीवर असलेला काचेचा पूल आहे. हा पूल जगातल्या मानव निर्मित आर्श्चयांपैकी एक म्हणावा लागेल. दहाएक दिवसांपूर्वी हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता.
जगातल्या हा पहिला वहिला काचेचा पूल पाहण्यासाठी पर्यटकांनी खूपच गर्दी केली होती. अल्पावधीतच या पूलाची माहिती सगळीकडेच पसरली या काचेचा पुलावरून चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करू लागले. पण हा पुल पर्यंटकांसाठी खुला होऊन अवघे दोन आठवडेही होत नाही तोच हा पूल कोणत्याही सूचना न देता बंद करण्यात आला. त्यामुळे जगभरातील पर्यटक नाराज झाले आहे. कंपनीने कोणत्याही सूचना न देता हा पूल बंद केला त्यामुळे हिरमोड झालेल्या पर्यटकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पूलाला भेट देण्यासाठी अनेकांनी आधीच तिकिट काढले होते. तर काही पर्यटक हे दूरुन येथे येणार होते. पण दोन आठवड्याच्या आत हा पूल बंद केल्याने अनेक पर्यटकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे चिडलेल्या ग्राहकांनी नुकसान भरपाई करून देण्याची मागणी केली आहे. हा पुल पुन्हा पर्यटकांसाठी कधी खुला करण्यात येईल याचीही माहितीही या कंपनीने दिली नाही.
चीनच्या मध्य हुनान प्रांतात झांगजीयाजी दरीवर काचेचा पूल बांधण्यात आला आहे. १ हजार ४१० फूट लांब आणि २० फूट रुंद असलेला हा पुल जमिनीपासून जवळपास हजार फूट उंच आहे. त्यामुळे गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील या पुलाची नोंद आहे. दरदिवशी जवळपास १० हजारांहून अधिक पर्यटक हा पूल पाहण्यासाठी येतात. पण याची मर्यादा मात्रा ८ हजार पर्यंटकांचे वजन पेलू शकेल इतकीच आहे. त्यामुळे अतिरिक्त पर्यटकांची संख्या रोखण्यासाठी ही कंपनी सॉफ्टवेअरमध्ये काही काम करत आहे त्यामुळे हा पूल बंद करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. मात्र हे स्पष्ट करतना हा पूल पुन्हा कधी खुला होईल हे मात्र कंपनीने सांगितले नाही.