ब्रिटनमधील ‘योगोव्ह’ या अंतरराष्ट्रीय मार्केट रिसर्च आणि डेटा अॅनलिसीस करणाऱ्या कंपनीने जगभरातील आदर्श घ्यावा अशा व्यक्तींची यादी तयार केली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या यादीमध्ये मायकोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे पहिल्या स्थानी कायम आहेत. मात्र या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बढती मिळली आहे. मागच्या वर्षी या यादीत आठव्या क्रमांकावर असणारे मोदी यंदा सहाव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे मोदी यांनी या यादीत पोर्तुगालचा लोकप्रिय फुटबॉलपटू आणि इटलीच्या युवेंटसचा मुख्य खेळाडू असणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे.

जगभरातील लोक कोणाला आपला आदर्श मानतात यासंदर्भात ‘योगोव्ह’ने यंदा ४१ देशांमधील नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणामध्ये ४२ हजारहून अधिक जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर जगातील सर्वात प्रभावशाली २० पुरुष आणि २० महिलांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये पुरुषांच्या यादीतील पहिली पाच नावे मागील वर्षाप्रमाणेच आहेत. पहिल्या क्रमांकावर बील गेट्स, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबमा, तिसऱ्या स्थानावर अभिनेता जॅकी चॅन, चौथ्या स्थानावर चीने अध्यक्ष शी जिंगपिंग आणि पाचव्या स्थानावर ‘अलीबाबा’चा संस्थापक जॅक मा यांचा समावेश आहे. या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांचा एकूण स्कोअर ४.८ इतका आहे. पाचव्या स्थानी असणाऱ्या जॅक मा यांचा स्कोअर ४.९ इतका आहे. नरेंद्र मोदींबरोबरच या यादीमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन (१२ व्या स्थानी), शाहरुख खान (१६ व्या स्थानी) आणि सलमान खान (१८ व्या स्थानी) या तीन भारतीयांचा समावेश आहे. एकाही भारतीय क्रिकेटपटूचा या यादीत समावेश नाही. अमिताभ यांचे स्थान मागील वर्षापेक्षा तीन जागांनी खाली घसरले असून शाहरुख आणि सलमान यांचा पहिल्यांदाच या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दुसरीकडे महिलांमध्ये पहिल्या स्थानी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा आहेत. याशीवाय महिलांच्या यादीमध्ये १३ व्या स्थानी दिपिका पादुकोण, १४ व्या स्थानी प्रियंका चोप्रा, १६ व्या स्थानी ऐश्वर्या राय तर १७ व्या स्थानी सुष्मिता सेन यांचा समावेश आहे. दिपिकाने मागील वर्षीच्या तुलनेत आपले स्थान कायम राखले आहे. प्रियांका १२ वरुन १४ व्या स्थानी घसरली असून ऐश्वर्या ११ वरून थेट १६ व्या स्थानी घसरली आहे. तर सुष्मिताचा पहिल्यांदाच या यादीत समावेश करण्यात आला आहे.