जगभरात करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या गुरुवारी १ लाख ४२ हजार ७०७ पर्यंत पोहचल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांकडून मिळवलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

गेल्या डिसेंबमध्ये सर्वप्रथम चीनमध्ये या महासाथीचा उगम झाल्यापासून १९३ देशांमध्ये करोनाबाधितांची २१,२९,३७८ हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापैकी किमान ५,३९,००० लोक बरे झाल्याचे मानले जात आहे. विविध देशांतील अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेली माहिती या आधारे या वृत्तसंस्थेने ही आकडेवारी संकलित केली आहे. अनेक देश अद्याप अतिशय गंभीर प्रकरणांची चाचणीच करत आहेत.

या महासाथीचा केंद्रबिंदू ठरलेल्या अमेरिकेत बळीसंख्या ३० हजार ९८५ झाली असून, ६,३९,६६४ लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. तेथे किमान ५०,१०७ लोक बरे झाले आहेत.

याखालोखाल फटका बसलेल्या देशांत इटलीचा क्रमांक आहे. तेथे २१,६४५ बळी गेले असून, १,६५,१५५ लोकांना संसर्ग झाला आहे. स्पेनमध्ये १,८२,८१६ लोक करोनाबाधित असून, १९,१३० लोकांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समधील करोनाबळींची संख्या १७,१६७ तर संसर्ग झालेल्यांची संख्या १,४७,८६३ इतकी आहे. ब्रिटनमध्ये ९८,४७६ लोक करोनाबाधित असून, तेथे १२,८६८ जणांचे बळी गेले आहेत. चीनने आतापर्यंत ३३४२ बळी जाहीर केले असून ८२,३४१ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले आहे. तेथे ७७,९८२ लोक बरे झाले आहेत.

अमेरिकेत २४ तासांत २६०० बळी

करोना विषाणूमुळे अमेरिकेत गेल्या २४ तासांत सुमारे २६०० नवे बळी गेले. हा नवा विक्रम आणि कुठल्याही देशातील करोनाबळींची एका दिवसातील सर्वात मोठी संख्या ठरली आहे, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. या विद्यापीठाने पुरवलेल्या बळींच्या आकडय़ानुसार, आदल्या दिवसाशी तुलना करता गुरुवारी सकाळपर्यंत देशात २५६९ लोक मृत्युमुखी पडले होते. यामुळे अमेरिकेतील आतापर्यंतची बळीसंख्या ३० हजार ९८५ पर्यंत पोहोचली आहे. जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा ही संख्या जास्त आहे.

युरोपमध्ये ९० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

* करोना विषाणूने युरोपमध्ये आतापर्यंत ९० हजारांहून अधिक बळी घेतले असून, ही संख्या जगभरातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या ६५ टक्के इतकी आहे.

* युरोप हा करोना महासाथीचा सर्वाधिक फटका बसलेला खंड ठरला आहे. येथे कोविड-१९ विषाणूचा १० लाख ४७ हजार २७९ लोकांना संसर्ग झाला असून, ९० हजार १८० लोक मरण पावले आहेत.

* जगभरात करोना विषाणूने १,४२,७०७ बळी घेतले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने देशोदेशांतील अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी दिली आहे.