कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची जगभरातील संख्या बुधवारी ८२ हजार ७२६ वर पोहचली.

गेल्या डिसेंबरमध्ये चीनमध्ये या महासाथीचा उगम झाल्यानंतर १९२ देशांमध्ये करोना संसर्गाची १४ लाख ३८ हजार २९० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापैकी किमान २ लाख ७५ हजार लोक बरे झाल्याचे मानले जात आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेने विविध देशांतील अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून ही आकडेवारी गोळा केली आहे, मात्र ती प्रत्यक्ष आकडेवारीपैकी काही भागच दर्शवीत असावी अशी शक्यता आहे. अनेक देश अजूनही अतिशय गंभीर प्रकरणांची केवळ तपासणीच करत आहेत.

मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेपासून जगभरात आणखी २५८४ बळींची आणि करोना संसर्गाच्या ४१४०७ नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली.

या काळात अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली. ही संख्या ८९० इतकी होती. याखालाखोर स्पेनमध्ये ७५७ जणांचा मृत्यू झाला.

फेब्रुवारीअखेर पहिला मृत्यू नोंदवलेल्या इटलीमध्ये सर्वाधिक, म्हणजे १७,१२७ मृत्यू झाले आहेत. येथे करोनाबाधितांची संख्या १,३५,५८६ इतकी असून, २४,३९२ लोक बरे झाले आहेत. स्पेनमध्ये १४,५५५ मृत्यूंची नोंद झाली असून, १,४६,६९० लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

अमेरिकेतील करोनाबळींची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकाची, म्हणजे १२ हजार ९११ इतकी आहे.

फ्रान्समधील स्थिती : फ्रान्समध्ये १० हजार ३२८ लोकांचे करोनामुळे बळी गेले असून, १०९०६९ लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. याखालोखाल असलेल्या ब्रिटनमध्ये ६,१५९ लोक मरण पावले असून, करोना संसर्गाची ५५,२४२ प्रकरणे झाली आहेत. चीनने आतापर्यंत ३३३३ करोनाबळी जाहीर केले आहेत. त्या देशात करोनाबाधितांची ८१,८०२ प्रकरणे असून, ७७,२७९ लोक करोनामुक्त झाले आहेत.