एका मुस्लिम मूर्तिकाराने जगातील सर्वाधिक उंच दुर्गा मातेची मूर्ती साकारण्याचा विक्रम केला आहे. नुरुद्दीन अहमद असे त्यांचे नाव असून त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका हिंदू देवतेची मूर्ती साकारणाऱ्या या मुस्लिम कलाकाराने ‘कलाकाराला कोणताही धर्म नसतो’ असे सांगत उच्च कोटीचा सामाजिक संदेशही दिला आहे.

अहमद हे गुवाहाटीचे काहिलीपाडा भागातील रहिवासी आहेत. त्यांनी गुवाहाटीतील विष्णुपूरमध्ये सप्टेंबर २०१७ मध्ये बांबूपासून ९८ फूट उंच दुर्गामातेची मूर्ती साकारली होती. त्यावेळी त्यांच्या या कामगिरीची बरीच चर्चा झाली होती. यावर बोलताना अहमद म्हणतात, अनेक लोक माझ्या कामाचे कौतुक करतात, मला त्रासही देत नाहीत. मात्र, काही लोक मला जाणीवपूर्वक विचारतात की या कामामध्ये माझा धर्म अडथळा ठरत नाही का? मात्र, मी त्यांना सांगतो की, यात धर्माची बाब येते कुठून. कलाकारांचा कोणताही धर्म नसतो.

सप्टेंबर २०१७ मध्ये हिंदू आणि मुसलमान या दोन्हीही समुदायांच्या ४० लोकांनी मिळून अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली ती विशाल मूर्ती बनवली होती. ती मूर्ती पाहण्यासाठी विष्णुपूरामध्ये एक लाख लोक आले होते. अहमद यांनी केवळ ७ दिवसांमध्ये ही मूर्ती बनवली होती. अहमद म्हणाले, ही मूर्ती साकारण्यासाठी आम्ही ४० दिवस निश्चित केले होते. त्यानुसार ती १७ सप्टेंबरपर्यंत तयारही झाली होती. मात्र, एका वेगाने आलेल्या वादळामध्ये दुर्गा पुजेच्या आठवडाभर आधीच या मूर्तिची मोडतोड झाली. त्यानंतर आठवड्याभराचे आव्हान पेलत आम्ही पुन्हा सुरुवातीपासून ती साकारली.

अहमद हे गुवाहटीमध्ये दुर्गा मातेच्या मंडपांच्या कला दिग्दर्शनाचे काम करतात. आपल्या कामासाठी ते बांबूचा वापर करतात. कारण, आसाममध्ये बांबू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या कामातून त्यांना बांबू कामाला प्रसिद्धी मिळवून द्यायची आहे.