जगातील पहिल्या ५०० श्रीमंतांना मागचे दोन महिने अत्यंत वाईट गेले आहेत. आर्थिक आघाडीवर त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा त्यांना जबर फटका बसला आहे. या आठवडयात ५०० श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये १८१ अब्ज डॉलर्स म्हणजे ११,७६७ अब्ज रुपयांची घट झाली आहे.

स्टील आणि अॅल्युमिनियमवर आयात शुल्क लागू करण्याच्या निर्णयामुळे ट्रेड वॉर सुरु होण्याची भिती असल्याने अमेरिकी शेअर बाजाराने दोनवर्षातील नीचांकी पातळी गाठली आहे. या महाश्रीमंतांच्या संपत्तीत २६ जानेवारीपासून ४३६ अब्ज डॉलर म्हणजे २८,३४५ अब्ज रुपयांची घट झाली आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला असून त्याची संपत्ती १०.३ अब्ज डॉलर म्हणजे ६७० अब्ज रुपयांनी कमी झाली आहे. केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणाचा फटका फेसबूकला बसला आहे. ५ कोटी युझर्सचा डाटा परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुकच्या विश्वासहर्तेला तडा गेला आहे. फेसबुकच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांची घट झाली आहे.