करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची जगभरातील संख्या सोमवारी ७०००९ इतकी झाल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांकडून गोळा केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात चीनमध्ये या महासाथीचा उगम झाल्यापासून जगभरातील १९१ देशांमध्ये करोनाची १२ लाख ७७ हजार ५८० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापैकी किमान २,४३,०० लोक बरे झाल्याचे मानले जाते.

फेब्रुवारीच्या अखेरीस पहिला करोनाबळी नोंदवलेल्या इटलीत या रोगाने १५,८७७ बळी घेतले आहेत. येथे १२८,९४८ लोकांना संसर्ग झाला असून, २१,८१५ लोक बरे झाले आहेत. स्पेनमध्ये करोनामुळे १३०५५ मृत्यू झाले आहेत, तर १३५,०३२ लोक करोनाबाधित आहेत. अमेरिकेत करोनाने ९६४८ बळी घेतले असून, तेथील करोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक, म्हणजे ३ लाख ३७ हजार ६४६ इतकी आहे.

फ्रान्समध्ये ९२,८३९ लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून, ८०७८ लोक मरण पावले आहेत. ब्रिटनमधील करोनाबळींची संख्या ४९३४ असून, ४७,८०६ लोक करोनाबाधित आहेत. चीनने आतापर्यंत ३३३१ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

युरोपात ५० हजारांहून अधिक बळी

करोनाच्या महासाथीने युरोपात ५० हजारांहून अधिक बळी घेतले असून, यापैकी बहुतांश स्पेन, फ्रान्स व ब्रिटनमधील आहेत, असे एएफपी या वृत्तसंस्थेने सोमवारी मिळवलेल्या अधिकृत आकडेवारीवरून दिसून येते. जगभरात कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी सर्वाधिक, म्हणजे ५० हजार २१५ मृत्यू युरोपातील आहेत. या खंडात ६,७५,५८० लोकांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. सर्वाधिक १५,८७७ बळी इटलीमध्ये, तर १३,०५५ बळी स्पेनमध्ये गेले आहेत. फ्रान्समध्ये ८०७८, तर ब्रिटनमध्ये ४९३४ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश देशांनी आंतर्देशिय आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केल्याने आंतराष्ट्रीय पर्यटक जागीच अडकून पडले आहेत. अमेरिकेने अशा आणीबाणीच्या स्थितीतही आपल्या नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. काठमांडू येथे अडकलेल्या अमेरिकन पर्यटकांना रविवारी विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले.