सुरक्षा मंडळात अफगाणिस्तानबाबत ठराव केला म्हणजे सगळे झाले, अशा गैरसमजात भारताने राहण्याचे कारण नाही. पाकिस्तान, चीन व तालिबानशासित अफगाणिस्तान हे एकत्र आले तर त्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण होईल, असा धोक्याचा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी दिला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी असलेल्या भारताने मांडलेला ठराव मंजूर झाला होता, त्यात अफगाणिस्तानचा वापर इतर देशांनी दहशतवादासाठी करू नये तसेच दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये असे त्या ठरावात म्हटले होते. तालिबान लोकांना सुरक्षितपणे देशाबाहेर जाण्याचे आश्वासन पाळेल अशी अपेक्षाही त्यात व्यक्त केली होती. चिदंबरम यांनी सांगितले, की चीन, पाकिस्तान व तालिबान शासित अफगाणिस्तान हे एकत्र आले तर ते धोक्याचे असेल.

संयुक्त राष्ट्रात सोमवारी जो ठराव मंजूर करण्यात आला होता, त्याला फ्रान्स, ब्रिटन व अमेरिकेने पुरस्कृत केले होते. रशिया व चीन अलिप्त राहिले होते. या ठरावाच्या विरोधात मतदान झाले नव्हते. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर हा सर्वात महत्त्वाचा ठराव होता व त्यात अफगाणिस्तानातील स्थितीबाबत इशारा देण्यात आला होता. चिदंबरम यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की भारताने ठराव संमत केला म्हणून खुशीत राहण्याचे कारण नाही कारण जर अफगाणिस्तान, चीन व पाकिस्तान हे देश एकत्र आले तर धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.