पश्चिम बंगालमध्ये अराजक माजलं आहे, ही स्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट आहे अशी टीका पाटण्याचे उपमुख्मयंत्री सुशील मोदी यांनी म्हटलं आहे. सुशील मोदी यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांना हेलिकॉप्टर उतरवण्यास बंदी करणे, अमित शाह यांच्या सभेला बंदी घालणं, भाजपा नेत्यांना बंगालमध्ये येण्यास मनाई करणे या सगळ्या गोष्टी ममता बॅनर्जींनी केल्या. या सगळ्या गोष्टी अराजकतेचं प्रतीक आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मात्र ममता बॅनर्जींना झटका बसला आहे. कोर्टाने राजीव कुमार यांनी सीबीआयसमोर येण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयने वारंवार नोटीस बजावूनही ते हजर राहिले नाहीत. आता मात्र ममता बॅनर्जींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीव कुमार यांना अडवून दाखवावं. जर ममता बॅनर्जींना असं वाटत असेल की त्या आमच्या विरोधातली लढाई जिंकल्या, तर असा विजय त्यांचा त्यांनाच लखलाभ असो असा टोलाही सुशील मोदी यांनी लगावला आहे. पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी एसआयटीचं प्रमुख करून ममता बॅनर्जींनी पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र रचले. चारा घोटाळ्यात जशी लालूप्रसाद यादव यांनी एसआयटीबाबत मनमानी केली होती तशीच मनमानी ममता करताना दिसत आहेत असंही सुशील मोदी यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, हे सगळं अराजक इथे माजलं आहे त्यातून बोध घेत बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींना धडा शिकवावा असंही आवाहन या पोस्टद्वारे सुशील मोदी यांनी केलं आहे.