संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पाच दिवसांपासून खासदार गोंधळ घालत आहेत. या सगळ्या गोंधळावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या संतापल्या आहेत. गोंधळी खासदारांपेक्षा शाळकरी मुलं बरी त्यांना गप्प बसा म्हटलेले समजते. खासदारांना मात्र तेवढीही समज नाही असे महाजन यांनी म्हटले आहे. काँग्रेस, एआयडीएमके, टीडीपीचे खासदार गेल्या काही दिवसांपासून गोंधळ घालत आहेत. गदारोळ माजवत आहेत, या सगळ्या प्रकारांवर सुमित्रा महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संसद हे चर्चेसाठी असते गोंधळ आणि गदारोळ घालण्यासाठी नाही. सरकार चर्चेसाठी तयार असताना काही खासदार अकारण गोंधळ घालत आहेत ही बाब योग्य नाही असेही सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे.

खासदारांनी गोंधळ घालण्यापेक्षा आणि गदारोळ माजवण्यापेक्षा जे काही मुद्दे आहेत ते मला सांगावेत मी सरकारला सांगेन की तुम्ही या मुद्द्यांवर चर्चा करा. परदेशातून शिष्टमंडळं येतात ती विचारतात की तुमच्या संसदेत हे काय सुरु आहे? शाळकरी मुलांचे संदेश येत आहेत की संसदेपेक्षा आमची शाळा शांत आहे. आता आपण शाळकरी मुलांपेक्षाही असमंजस झालो आहोत का? असा प्रश्नच मला या खासदारांकडे पाहून पडला आहे असेही सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे.

राफेल कराराचा मुद्दा पुढे करत संयुक्त संसदीय समिती स्थापण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होते आहे. मात्र ही समिती नेमणे माझ्या अधिकारात येत नाही. राफेल करारासंबंधी जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती नेमण्यात यावी अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. ही मागणी स्वीकारण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र या गोष्टी माझ्या अधिकारात येत नाहीत हे ठाऊक असताना काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार गोंधळ घालताना आणि गदारोळ माजवताना दिसत आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे असेही महाजन यांनी म्हटले आहे.

राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सरकारला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काहीही मुद्दा उरलेला नाही तरीही आम्ही या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत असे संसदीय कामकाज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात राफेल प्रकरण, आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी, शेतकरी आत्महत्या, कावेरी प्रश्न या मुद्द्यांवरून गदारोळ झाला आहे. त्यामुळे कामकाज सुरळीत चालू शकलेले नाही. याच सगळ्या प्रकारांवर सुमित्रा महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.