तुम्हालाही सर्वात स्वस्त भारत- अमेरिका प्रवास विमानानं करायचा आहे? तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण आइसलँडच्या ‘वॉव एअर’ या विमानसेवा कंपनीने सर्वात स्वस्त विमान प्रवासाची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच आता प्रवाशांना फक्त साडेतेरा हजारांत दिल्ली ते अमेरिका असा प्रवास करता येणार आहे. तर दिल्ली – अमेरिका- दिल्ली अशा राऊंड ट्रिपसाठी साडेतेरा हजार या हिशोबानं २७ हजार रुपये एवढी रक्कम मोजावी लागणार आहे. हे प्रवास भाडं सध्याच्या विमान प्रवासापेक्षा तुलनेनं खूपच कमी आहे.

वॉव एअरने मंगळवारी या सेवेची घोषणा केली. भारतातील त्यांची सेवा डिसेंबरपासून सुरू होणार असून पहिले उड्डाण ७ डिसेंबरला होणार आहे. दिल्ली विमानतळावरून सुटणारं विमान आईसलँडची राजधानी रेकजॅविकमार्गे न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को किंवा लॉस एंजेलिस येथे उतरेल. ‘जर तुम्ही पाहिलं तर भारत ते पूर्व अमेरिकेला जोडणारा सर्वात लहान मार्ग हा आईसलँडवरून जातो. सहाजिकच पल्ला जितका लहान तितकीच इंधनाची बचत होईल त्यामुळे आपसुकच प्रवासाचा खर्चही कमी होईल’ अशी माहिती या विमानसेवेचे संस्थापक स्कली मॉगेनसन यांनी दिली.

भारत आणि अमेरिकेतून दररोज सुमारे २० हजार प्रवासी ये-जा करतात. या सर्वांसाठी हा प्रवास नक्कीच फायदेशीर ठरेल अशीही माहिती स्कली यांनी दिली. या विमानसेवेत प्रवाशांना वेगवेगळ्या सोयी पुरवण्यात येतील. अर्थात त्यासाठी अतिरिक्त पैसे ग्राहकांना मोजावे लागतील अशी माहितीही स्कल यांनी दिली आहे.