खेळ विश्वातील देशात प्रतिष्ठेचा समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आपल्याला जाहीर न झाल्याने कुस्तीपटू बजरंग पुनियाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाविरोधात त्याने कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे. बजरंगने याच वर्षी गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स आणि जकार्ता एशिअन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. या कामगिरीसाठी त्याची भारतीय कुस्तीसंघाकडून खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारिश करण्यात आली होती.

आपल्या नावाची शिफारस करण्यात आल्यानंतरही सरकराने आपल्याला डावलून हा पुरस्कार संयुक्त स्वरुपात क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्व भारोत्तोलक मीराबाई चानू यांना जाहीर केला. त्यामुळे याप्रकरणी उद्या (शुक्रवारी) बजरंग क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांची भेट घेणार आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत बजरंगने ही माहिती दिली. फर्स्टपोस्टने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बजरंग म्हणाला, पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर मी नाराज आणि आश्चर्यचकित झालो. यासंदर्भात मी शुक्रवारी खेळ मंत्र्यांची भेट घेणार आहे. माझे मेंटॉर योगी भाई (योगेश्वर दत्त) यांचे खेळ मंत्र्यांशी बोलणे झाले असून भेटीसाठी वेळ निश्चित केली आहे. माझे नाव या यादीत का आले नाही. मी याचा हक्कदार आहे की नाही, याचे कारण मला जाणून घ्यायचे आहे. जर मी हक्कदार असेन तर मला हा पुरस्कार देण्यात यावा.

क्रीडा मंत्र्यांनी जर माझ्या म्हणण्यावर सहमती दर्शवली नाही, तर शेवटी मला कोर्टाची पायरी चढावी लागेल. मला वाटतं की या वर्षी मी या पुरस्काराचा दावेदार होतो. त्यासाठीच मी शिफारस पाठवली होती. कोणत्याही खेळाडूला पुरस्कारासाठी भीक मागणे योग्य नव्हे. मात्र, त्यांच्यासाठी हा मोठा सन्मान असल्याने त्याकरीता लढावेच लागेल. त्यातच कुस्तीपटूचे करियर तर खूपच अनिश्चित असते. कोणत्याही क्षणी मैदानात झालेली दुखापत संपूर्ण करिअर कायमचे संपवू शकते. हा माझा वैयक्तिक लढा असून यात मला कुस्ती महासंघाला आणायचे नाही, असेही बजरंग पुनियाने म्हटले आहे.

यंदा २९ ऑगस्ट ऐवजी २५ सप्टेंबरला या पुरस्कारांचे वाटप होणार आहे. कारण निश्चित तारखांदरम्यान आशियाई स्पर्धा सुरु होती.