News Flash

प्रसिद्ध लेखिका गीता मेहता यांचा ‘पद्मश्री’ स्वीकारण्यास नकार

निवडणुकीच्या तोंडावर मला हा सन्मान देण्यात आल्याने याचे गैरअर्थ निघू शकतात. त्यामुळे मी हा पुरस्कार स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

ख्यातनाम लेखिका आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहीण गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे. भारत सरकारने मला हा सन्मान दिला, यासाठी मी त्यांची आभारी आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर मला हा सन्मान देण्यात आल्याने याचे गैरअर्थ निघू शकतात. त्यामुळे मी हा किताब स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले. लेखिका गीता मेहता यांना देखील पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले. गीता मेहता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहीण आहेत. त्या सध्या परदेशात राहतात. भारत सरकारने दिलेला हा किताब गीता मेहता यांनी नाकारला आहे. त्यांनी न्यूयॉर्कमधून केंद्र सरकार आणि माध्यमांना निवेदन पाठवून किताब स्वीकारण्यास नकार दिला आहे.

भारत सरकारने मला हा किताब दिला आणि यासाठी मी त्यांची आभारी आहे. पण हा पुरस्कार मी स्वीकारु शकत नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना हा पुरस्कार दिल्याने गैरअर्थ निघू शकतात. हे भारत सरकार आणि माझ्यासाठी भूषणावह ठरणार नाही आणि म्हणूनच हा पुरस्कार स्वीकारणार नाही, असे त्यांनी सांगितले. मेहता यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले. गृहमंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात मेहता यांना परदेशी नागरिक म्हटले असले तरी मेहता यांच्याकडे भारतीय पासपोर्ट असून त्या अजूनही भारतीयच आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

गीता मेहता यांनी कर्म कोला (१९७९), राज (१९८९), अ रिव्हर सूत्र (१९९३), इटर्नल गणेशा- फ्रॉम बर्थ टू रिबर्थ अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी १४ हून अधिक माहितीपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 10:33 am

Web Title: writer sister of odisha cm naveen patnaik gita mehta refused to accept padmi shri
Next Stories
1 Republic Day 2019: मोदींचं सोशल मीडियास्त्र त्यांच्यावरच उलटलं आहे का?
2 प्रजासत्ताक दिनी सुरक्षा दलांचा दहशतवाद्यांना दणका, दोघांना कंठस्नान
3 Republic Day: राजपथावर लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन
Just Now!
X