मी पंतप्रधान होणार का, हा सद्यस्थितीत चुकीचा प्रश्न असल्याचे मत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केले. पक्षाच्या खासदारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी पक्षश्रेष्ठी संकल्पनाही आपल्याला आवडत नसल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
एकीकडे राहुल गांधी यांना कॉंग्रेस पक्ष पंतप्रधान म्हणून जाहीर करण्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना खुद्द राहुल यांनीच हा प्रश्न चुकीचा असल्याचे सांगून सध्यातरी त्याला अर्धविराम दिलाय.
काही मूठभर लोकांकडे पक्षाचे निर्णय घेण्याची जबाबदारी देण्यापेक्षा जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना नेतृत्त्वासाठी सक्षम करण्यावर माझा जास्त विश्वास असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानपदापेक्षा पक्ष वाढविणे, हे माझ्यासाठी प्राधान्याचे काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळात मधल्या फळीतील नेत्यांना पाठबळ देण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. देशात सध्या बहुजन समाज पक्षासारखे एकच नेता असलेले काही पक्ष आहेत. समाजवादी पक्षासारख्या काहींमध्ये दोनच नेते आहेत. भाजपसारख्या काही पक्षांचे पाच ते सहा नेते असून, केवळ कॉंग्रेसमध्ये १५ ते २० नेते आहेत. पक्षातील सर्व खासदार आणि सुमारे पाच हजार आमदारांना सक्षम करण्यास माझे प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले.