10 August 2020

News Flash

कोरोना विषाणूचे ९ बळी; ४४० जणांना संसर्ग

कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

वृत्तसंस्था, बीजिंग

चीनमध्ये कोरोना विषाणूने आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या आता ९ झाली असून एकूण ४४० जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी धोक्याचा इशारा जारी केला असून चीनमध्ये नववर्षांच्या सुटीच्या काळात हा विषाणू आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली आहे. याकाळात लाखो लोक देशात व परदेशात पर्यटनासाठी जात असतात, त्यामुळे हा विषाणू पसरू  शकतो.

कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. हा विषाणू आतापर्यंतच्या कोरोना विषाणूंपेक्षा वेगळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विषाणूच्या संसर्गाने ताप, कफ, श्वसनात अडथळे अशी लक्षणे दिसत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४४० जणांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणे दिसत आहेत. आतापर्यंत मध्य चीनमधील हुबेई प्रांतात नऊ बळी या विषाणूने घेतले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपसंचालक ली बिन यांनी दिली आहे. श्वसनमार्गात हा विषाणू पसरत असल्याचे दिसून आले आहे. जपानमध्ये एक, थायलंडमध्ये तीन, कोरियात एक रुग्ण सापडला आहे. अमेरिकेतही एक रुग्ण सापडला आहे. चीनमधील वुहान येथून अनेक लोक इतर देशात जातात त्यांच्यातून हा विषाणू पसरत आहे. वुहान येथून अमेरिकेतील सियाटल येथे आलेल्या एकाला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चीनमधील आरोग्य खात्याच्या माहितीनुसार एकूण २१९७ लोक विषाणूग्रस्तांच्या संपर्कात आले असून त्यातील १३९४ जणांना देखरेखीखाली ठेवले आहे, तर ७६५ जणांना तपासणीनंतर घरी जाऊ देण्यात आले. या विषाणूचा नेमका स्रोत अजून चीनला सापडलेला नाही.

आठवडाभर सुटी जाहीर

चीनमध्ये १० जानेवारीपासून सुटीचा मोसम सुरू झाला असून तो ४० दिवसांचा असतो, त्यातच आता चीनने २४ जानेवारीपासून आठवडाभर सुटी जाहीर करण्याचे ठरवले आहे. काही रुग्णांना वेगळे ठेवण्याचा अधिकार रुग्णालयांना देण्यात आला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेची बैठक होत असून तीत या विषाणूची लागण ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 1:02 am

Web Title: wuhan coronavirus death toll rises to 9 with 440 infected says china zws 70
Next Stories
1 महाभियोग सुनावणीच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी
2 ‘गगनयान’च्या पूर्वतयारीसाठी डिसेंबरमध्ये निर्मनुष्य अवकाश मोहीम
3 बलात्काराचा आरोप असलेल्या नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून नोटीस जारी
Just Now!
X