गेल्या काही महिन्यांपासून जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. यापूर्वी काही देशांनी चीननं करोनाची माहिती लपवल्याचा आरोपही केला होता. परंतु चीन सतत या आरोपाचं खंडन करत आला आहे. अशातच चीनमधील प्रमुख डॉक्टरनं करोना विषाणूच्या प्रसाराबाबत खळबळजनक दावा केला आहे. करोना महामारीबाबत चीनच्या प्रशासनानं महत्त्वपूर्ण माहिती लपवल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर तपासणीसाठी वुहानच्या बाजारपेठेत येण्यापूर्वीच सर्व पुरावे नष्ट केले गेले असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

करोनाच्या सुरूवातीच्या काळात यावर तपास करणारे डॉक्टर क्वोक युंग युएन यांनी करोनाबाबतचे सर्व पुरावे चीननं नष्ट केले असल्याचा आरोप केला आहे. तसंच सुरूवातीच्या काळात वैद्यकीय तपासाचा वेगही कमी होता असं त्यांनी म्हटलं आहे. “जेव्हा आम्ही युनानच्या सुपरमार्केटमध्ये गेलो त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी काहीच सापडलं नाही. मार्केट पहिलेच स्वच्छ करण्यात आलं होतं. क्राईम सीन पहिलेच बदलण्यात आलं होतं असंही म्हटलं तरी चालेल,” असं क्वोक युंग युएन म्हणाले. बीबीसीशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

“आम्ही जाण्यापूर्वीच मार्केट साफ केलं असल्यामुळे आम्हाला कोणत्या गोष्टींमुळे हा विषाणू मानवात पसरला याची माहिती मिळाली नाही. वुहानमध्ये या प्रकरणावर पडदा घालण्यासाठी त्यांनी काहीतरी केलं असल्याची मलाही शंका आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. ज्या स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती पुढे पाठवायची होती त्यांनी योग्यरित्या काम करू दिलं नसल्याचंही क्वोक युंग युएन म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात करोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे. जगभरात आतापर्यंत १.६६ कोटी करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर करोनामुळे जगभरात आतापर्यंत ६.५६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेलाही बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४४ लाख लोकांना करोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच करोनामुळे गेल्या काही काळात अमेरिकेनं चीनवर आरोपही केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले आहेत.