जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसमुळे आजवर २७ हजार पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. चीनच्या वुहान शहरातून या व्हायरसचा सर्वत्र प्रसार झाला. वुहानच्या मासळी बाजारातून, ज्या महिलेपासून करोना व्हायरसचा फैलाव होण्यास सुरुवात झाली तिची ओळख पटवण्यात आली आहे. वेई गायक्सियन असे या महिलेचे नाव असून, त्या ५७ वर्षांच्या आहेत.

वेई गायक्सियन करोना व्हायरसच्या पहिल्या रुग्ण असल्याने त्यांच्याकडे ‘पेशंट झिरो’ म्हणून पाहिले जाते. महिन्याभराच्या औषधोपचारानंतर जानेवारीमध्ये त्या करोना व्हायरसमधून पूर्णपणे बऱ्या झाल्या. चीन सरकारने थोडी आधी हालचाल केली असती तर, या धोकादायक व्हायरसला फैलावण्यापासून रोखता आले असते, असे वेई यांचे मत आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने वेई गायक्सियन यांना शोधून काढले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

ह्युनान सीफूड मार्केटमध्ये कोळंबी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. १० डिसेंबरला सर्वप्रथम त्यांना सर्दी आणि ताप आला. सुरुवातीला त्यांना सामान्य ताप असल्याचे वाटले. उपचारासाठी त्या स्थानिक दवाखान्यात गेल्या. तिथे त्यांना इंजेक्शन देण्यात आले असे यूकेच्या मिररने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दवाखान्यातील औषधउपचारानंतरही काही फरक पडला नाही. त्यांना थकवा जाणवत होता. दुसऱ्यादिवशी त्या वुहान शहरातील इलेव्हथ हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यानंतरही त्रास कायम होता.

त्यामुळे वेई १६ डिसेंबरला सर्वात मोठया वुहान युनियन हॉस्पिटलमध्ये गेल्या. आजार कसा बळावत चालला आहे, त्याबद्दल त्यांनी वुहान युनियन हॉस्पिटलमधील डॉक्टरांना सांगितले. वेई यांच्याप्रमाणेच लक्षणे असलेले ह्युनान मार्केटमधील अनेकजण त्या रुग्णालयात गेले होते. तो पर्यंत सीफूड मार्केटमधून करोना व्हायरसची उत्पत्ती झाल्याचे ड़ॉक्टरांच्या लक्षात आले होते. डिसेंबर महिन्यात वेई यांनी क्वारंटाइनमध्ये राहण्यास सुरुवात केली.

करोना व्हायरसचा सर्वत्र फैलाव झाल्यानंतर वुहानमधील ते सीफूड मार्केट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले. जानेवारी महिन्यात वेई यांचा करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला व त्या या आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या. बाजारातील मटण विक्रेते ज्या प्रसाधनगृहाचा वापर करायचे, त्याचाच वापर मी करत होते. त्यामुळे आपल्याला या व्हायरसची लागण झाली असे वेई यांचे मत आहे. त्यांच्या आसपासच्या विक्रेत्यांनाही या व्हायरसची लागण झाल्याची माहिती वेई यांनी दिली.

वुहान महापालिका आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, COVID-19 जे पहिले २७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यामध्ये वेई एक होत्या. या २७ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २४ सीफूड मार्केटमधील रुग्ण होते. चीन प्रशासनाने वेळीच पावले उचलली असती, तर आज मृतांचा आकडा कमी झाला असता असे वेई यांनी सांगितले. वेई या पेशंट झिरो असल्या तरी करोना व्हायरसची लागण झालेल्या त्या पहिल्या रुग्ण नाहीत असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

एक डिसेंबरला पहिल्या रुग्णाला COVID-19 ची लागण झाल्याचे निदान झाले असे लँसेट मेडिकल जर्नलने आपल्या स्टडी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. करोना व्हायरसमुळे शनिवारपर्यंत जगभरात २७,९८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. १८३ देशात ६ लाखापेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत इटलीमध्ये सर्वाधिक ९,१३४ त्यानंतर स्पेन ५,६९० आणि चीनमध्ये ३,२९५ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत १ लाखापेक्षा जास्त लोकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे.