WWE सुपरस्टार आणि अनेक दिग्गजांना पराभूत करणारा द ग्रेट खली आता दिल्ली एनसीआरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरला आहे. त्यानं सरकारकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची आणि कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. आपण सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलो असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर त्या ठिकाणाहून हटणार नाही, असंही तो म्हणाला. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“शेतकऱ्यांकडून धान्य काही रूपयांना घेतलं जाईल आणि सामान्य माणसाला ते २०० च्या हिशोबानं विकलं जाईल. त्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचं मोठं नुकसान होणार आहे,” असंही खली या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये खलीनं सर्व लोकांना शेतकऱ्यांसोबत राहण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरून सरकार हे कायदे मागे घेण्यास आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार होईल.

आणखी वाचा- मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं होणार अर्ध; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

“केंद्र सरकारची पंजाब आणि हरयाणातील लोकांशी गाठ पडली आहे. त्यांचा सामना करणं त्यांना कठिण आहे. आपल्यासोबत आलेले लोकं सहा महिन्यांचं रेशन घेऊन आले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोवर मागे हटणार नाही,” असंही तो म्हणाला. नुकतंच लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होत आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान आणि व्यापारी वर्गाला फायदा होणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी सरकारसोबत बैठक केली होती. परंतु त्यातून कोणताही तोडगा निघाला नव्हता.