18 October 2019

News Flash

पुण्यातील झेंडर इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटविरोधात डिजिटल पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ज्यावेळी लॅपटॉप तपासले गेले त्यावेळी अनेक ईमेल्स गहाळ झाल्याचे आढळले

पुणेस्थित झेंडर इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या कंपनीविरोधात 450 कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भातील खटल्यातील डिजिटल पुरावे, इन्व्हॉइसेस, बांधकाम प्रकल्प अहवाल नष्ट करणे तसेच संभाषणं बेकायदेशीर मार्गानं मिळवणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय संविधानाच्या 204 कलमाखाली (इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जे पुरावा ठरू शकते ते नष्ट करणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 43 व 66 कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

झेंडर ग्रुप या जागतिक स्तरावरील गुंतवणूक क्षेत्रातील कंपनीच्या प्रायवेट इक्विटी रियल इस्टेटशी संबंधित उपकंपनीच्या विरोधात केयुडीपीएलचे संचालक ललित जैन यांनी तक्रार दाखल केली आहे. कोथरूडमधील निर्वाणा हिल्स या प्रकल्पात समभागांच्या व नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या माध्यमातून 280 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी केयुडीपीएलनं 2013 मध्ये झेंडर इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटशी करार केला.

जैन यांनी झेंडर इन्व्हेस्टमेंटविरोधात आणि चीफ मॅनेजर रोहन सिक्री, प्रतीक टिबरवाल व राकेश शाह यांच्याविरोधात 450 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दिवाणी खटला दाखल केला होता, त्या पाठोपाठ हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. झेंडरनं जैन व केयुडीपीएलच्या संचालकांच्या विरोधातही मे महिन्यात दिल्लीमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीसंदर्भात केयुडीपीएल सिन्यू डेव्हलपर्सच्या (झेंडरची सहयोगी कंपनी) कर्मचाऱ्यांशी झालेल्या संवादाचे ईमेल रेकॉर्ड पुरावा म्हणून सादर करू इच्छित होती.

परंतु, ज्यावेळी लॅपटॉप तपासले गेले त्यावेळी केयुडीपीएलच्या अधिकाऱ्यांना अनेक ईमेल्स गहाळ झाल्याचे आढळले. “डिलीट करण्यात आलेले ईमेल दिल्ली उच्च न्यायालयातील व पुणे सत्र न्यायालयातील दिवाणी खटल्यात पुरावा म्हणून उपयोगी होते,” तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ज्यांचे ईमेल डिलीट करण्यात आले आहेत अशा अनेक कर्मचाऱ्यांचे ईमेल आयडीही तक्रारदारांनी दिले आहेत. ईमेल व अन्य इलेक्ट्रॉनिक माहिती डिलीट करण्यासंदर्भातील तक्रारीची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on October 9, 2019 4:43 pm

Web Title: xander investment management destruction of digital evidence fir lodged