आशियातील अमेरिकेचा लष्करी धाक बघता चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी बुधवारी आशियाई देशांना त्यांच्यातील सुरक्षा सोडवण्याबाबत आचारसंहिता असावी, अशी नवीनच कल्पना मांडली आहे. दरम्यान त्यांनी दहशतवादाशी लढण्याचे प्रयत्न वाढवण्याचेही ठरवले आहे.
अमेरिका व आशियातील त्याच्या मित्र देशांना गर्भित इशारा चीनने दिला असून चीन विरोधी लष्करी आघाडय़ा तयार केल्या तर त्याचे वाईट परिणाम होतील असे संकेत दिले आहेत. संबंध जपान, व्हिएतनाम व फिलिपिन्स यांच्याबरोबरचे चीनचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही त्याबाबत शून्य सहनशीलता राहील असे जाहीर करताना ते म्हणाले की, आशियायी देशांनी सुरक्षा सहकार्यासाठी शाश्वत यंत्रणा उभारली पाहिजे. आशियातील सुरक्षेचे प्रश्न आशियायी देशांनीच सोडवावेत.  
कॉन्फरन्स ऑन इंटरॅक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स इन आशिया या संस्थेच्या शिखर बैठकीत त्यांनी या योजनेचा आराखडा मांडला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्ष व इतर काही देशांचे नेते व संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यावेळी उपस्थित होते.
भारतासह ४० देशांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सीआयसीए ही २६ देशांची संघटना १९९९ मध्ये स्थापन झाली होती.