“चीनने भारताविरोधात जो आक्रमक पवित्रा घेतलाय, त्यामागे शी जिनपिंग यांची खेळी आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय प्रदेशात घुसखोरीचा निर्णय घेऊन, स्वत:च्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने मोठा धोका पत्करला आहे. भारतीय सैन्याने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे जिनपिंग यांची चाल फ्लॉप ठरली आहे” असे अमेरिकन मॅगझिनने म्हटलं आहे.

शी जिनपिंग यांच्या समर्थनानेच लडाख सीमेवर चीन भारताविरोधात आक्रमकता दाखवत आहे. पण त्यांची पीपल्स लिबरेशन आर्मी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. भारतीय सीमेवर चिनी लष्कराच्या अपयशाचे दूरगामी परिणाम होतील असे ‘न्यूजवीक’ या मॅगझिनच्या ओपिनियन पीसमध्ये म्हटलं आहे.

चिनी सैन्याच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांना अधिकाऱ्यांना बदलण्याचे एक कारण मिळाले आहे. सैन्य दलात त्यांच्याशी निष्ठावान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची संधी मिळाली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय आणि चिनी सैनिकांच्या संर्षामध्ये ४०-४५ नव्हे तर ६० चिनी सैनिक ठार झाले होते, असा खुलासा अमेरिकेच्या ‘न्यूजवीक’ मॅगझिनने केला आहे. सततच्या या अपयशामुळे चीनचा हा आक्रमक सत्ताधारी पुन्हा भारतावर आक्रमक चाल करुन येऊ शकतो, असा इशारा ‘न्यूजवीक’ने दिला आहे.