स्वस्त दरात चांगले फिचर देणा-या शिओमी आता नवीन मोबाईल फोन लाँच करणार आहे. एमआय मिक्स हा फोन ४ नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच होण्याची शक्यता असून या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनची स्क्रीन सर्वात मोठी असणार आहे. या फोनचा डिस्प्ले ६.४ इंच एवढा असून यात स्क्रीन टू बॉडीचे प्रमाण ९१.३ टक्के ऐवढे असणार आहे.  या फोनची किंमत ३,४९९ युआन (भारतीय चलनानुसार सुमारे ३४ हजार रुपये) आहे.

चीनमधील ख्यातनाम कंपनी शिओमीने बीजिंगमध्ये मंगळवारी एमआय नोट २ हा फोन लाँच केला. या दरम्यान शिओमीने नोव्हेंबरमध्ये एमआय मिक्स हा फोन लाँच करु असे जाहीर केले आहे. साधारणपणे फोनच्या डिस्प्लेमधील वरचा भाग हा कॅमेरा तसेच स्पीकरसाठी असतो. तर खालचा भाग माईक आणि अन्य बटणांसाठी असतो. पण शिओमीने आता ही संकल्पना मोडीत काढण्याची तयारी केली आहे. शिओमीने फ्रान्समधील डिझायनर फिलीप स्टार्क यांना नेमले आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच शिओमीने हा फोन बनवला आहे. या फोनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या फोनचा डिस्प्ले ६.४ इंच असून त्यातील ९१ टक्के स्क्रीन वापरात असेल. म्हणजे स्क्रीन टू बॉडी हे प्रमाण ९१.३ टक्के ऐवढे असेल. स्पीकर, माईक यासाठी फोनमध्ये ‘पायझोइलेक्ट्रीक सिरॅमिक ऑक्टेटर’ या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कॉलच्या दरम्यान आवाज युजरच्या कानापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. काळ्या रंगाच्या सिरॅमिकमध्ये हा फोन उपलब्ध असेल. या फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फोन हातात असताना तुमच्या तळहाताने डिस्प्लेला स्पर्श केला तरी फोन चालू होणार नाही याची दक्षताही घेण्यात आली आहे.

कसा असेल एमआय मिक्स ?

> एमआय मिक्स १२८ जीबी आणि २५६ जीबी अशा दोन प्रकारात येतील. या दोन्ही फोनमध्ये एक्स्पांडेबल मेमरीचा पर्याय नसेल.

> अंतर्गत साठवणूक क्षमता १२८ जीबी असलेल्या फोनमध्ये ४ जीबी रॅम असेल.

> एमआय मिक्स १२८ जीबी फोनची किंमत ३,४९९ युआन  (भारतीय चलनानुसार सुमारे ३४ हजार रुपये) असेल.

> अंतर्गत साठवणूक क्षमता २५६ जीबी असलेल्या फोनमध्ये ६ जीबी रॅम असेल.

> एमआय मिक्स २५६ जीबी फोनची किंमत ३,९९९ युआन (भारतीय चलनानुसार सुमारे ३९ हजार रुपये) असेल.

> एमआय मिक्स १२८ जीबी आणि २५६ जीबी या दोन्हीमधील उर्वरित फिचर्ससारखेच असतील.

एमआय मिक्सचे फिचर्स

डिस्प्ले – ६.४ इंच

प्रोसेसर – २.३५ गीगाहर्टचा स्नॅपड्रॅगन ८२१ क्वाड कोअर चिपसेट (गुगल पिक्सेलमध्ये स्नॅपड्रॅगन ८२१ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.)

मुख्य कॅमेरा – १६ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा – ५ मेगापिक्सेल

बॅटरी – ४,४०० एमएएच (फोनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा. ३० मिनिटांमध्ये ८३ टक्के बॅटरी चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे.)

फिंगरप्रिंट सेंसर – हो. फोनच्या मागच्या बाजूस कॅमे-याच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

सिम कार्ड – ड्यूअल सिम (दोन्ही नॅनो सिम)