क्या यार, स्पॉट फिक्सिंग क्यूं किया… हा प्रश्न होता १२ वर्षांच्या एका मुलाचा. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटकेत असलेल्या क्रिकेटपटू एस श्रीशांतला तुषार नावाच्या मुलाने न्यायालयात हा प्रश्न विचारला आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. श्रीशांतचा चाहता असलेला तुषार हा सध्या दिल्लीतील एअरफोर्स बाल भारती शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत आहे.
श्रीशांतला न्यायालयात सुनावणीसाठी आणलेले असताना तुषार तिथे पोहोचला. न्यायालयातील सुमारे अडीच ते तीन तासांची सुनावणीवेळी तुषारने श्रीशांतला गाठले आणि त्याला थेटपणे स्पॉट फिक्सिंग का केले, असा प्रश्न विचारला. त्याला श्रीशांतने लगेचच ‘यार, मैने नही किया’ असे उत्तर दिले. त्यानंतरही तुषारने श्रीशांतसमोर प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली. तो एकामागून एक प्रश्न विचारतच राहिला. तुषारने न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनाही वकील आता श्रीशांतची बाजू न्यायालयात कशी मांडतील, असा प्रश्न विचारून त्यांच्याकडूनही माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर तुषारने आपल्याकडील एक कागद श्रीशांतपुढे देत त्याला स्वाक्षरी देण्याची मागणी केली. मात्र, मी पोलिस कोठडीमध्ये असल्याने स्वाक्षरी देऊ शकणार नाही, असे श्रीशांतने त्याला सांगितले. त्यानंतरही तुषारचा आग्रह सुरूच राहिल्याने अखेर श्रीशांतने त्याच्याकडून कागद घेतला आणि त्यावर लिहिले… ‘Dear Tushaar..Please do pray for me!’ (प्रिय तुषार, माझ्यासाठी प्रार्थना कर) या ओळींखाली अखेर श्रीशांतने स्वाक्षरीही केली.