जगातील मोठ्या सर्च इंजिन्सपैकी एक असलेल्या ‘याहू’ ची विक्री होणार आहे. याहूचा व्यवसाय ३३ हजार ५०० कोटी रूपयांना व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स विकत घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘याहू’ ला गुगल आणि फेसबुककडून कडवी झुंज मिळत आहे. या कंपन्यांमुळे ‘याहू’च्या नफ्यात देखील गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे.
‘याहू’सोबत झालेल्य या करारामुळे व्हेरिझॉनच्या ‘एओएल इंटरनेट’ व्यवसायाला तेजी मिळेल. व्हेरिझॉनने गेल्याच वर्षी एओएलला ४.४ अरब डॉलमध्ये विकत घेतले होते. या विक्रीनंतर याहूचा ऑपरेटिंग कंपनी म्हणून असलेला प्रवासदेखील संपुष्टात येईल. तसेच, यानंतर ‘याहू’ची केवळ ‘याहू जापान’मध्ये ३५.५ टक्के आणि चीनच्या ई-कॉमर्स कंपनी ‘अलीबाबा ग्रुप होल्डिंग’मध्ये १५ टक्के हिस्सेदारी राहिल.
व्हेरिझॉन सध्या ‘याहू’चा मूळ व्यवसाय खरेदी करणार आहे. या व्यवहारात ‘याहू’च्या मालमत्तेचा समावेश असला तरी ‘याहू’च्या पेटंटचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही. ‘याहू’चे बाजारमूल्य ३ हजार ७४१ कोटी डॉलर्स आहे. तर ‘याहू’च्या मूळ व्यवसायाचे बाजारमूल्य २४ हजार ७०० कोटी रूपये आहे.