याहूचा ई-मेल वापरणाऱ्या अनेकांच्या अकाऊंटचा युजरनेम आणि पासवर्ड चोरून वैयक्तिक माहिती पाहिली गेल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीने गुरुवारी याबाबत माहिती दिली. मात्र एकूण किती अकाऊंटच्या पासवर्डची चोरी झाली याबाबत कंपनीने काहीही माहिती दिलेली नाही.
गुगलच्या जी-मेल सेवेनंतर याहूच्या ई-मेलचा सर्वाधिक वापर केला जातो. जगभरातील २७ कोटीहून अधिक जण याहूच्या मेलचा वापर करतात. त्यापैकी आठ कोटी नेटिझन्स तर अमेरिकेतीलच आहेत. मात्र बहुसंख्य अकाऊंटच्या पासवर्डची चोरी झाल्याचे कंपनीने गुरुवारी रात्री आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे. पासवर्ड चोरून वैयक्तिक माहिती पाहणे, त्याशिवाय या अकाऊंटमधून कोणाला मेल पाठवण्यात आले, कुणाचे मेल आले आहेत, याची माहिती चोरटय़ांनी घेतल्याचे कंपनीने सांगितले. काही नव्या ई-मेलला स्पॅम पाठवण्यासाठी ही माहिती चोरण्यात आली असावी, अशी शक्यता कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे. चोरलेल्या ई-मेलमधून वेगवेगळय़ा मेलधारकांना बनावट मेल पाठवून त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती मागवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेटिझन्सने कोणत्याही ई-मेलला उत्तर देताना खबरदारी घ्यावी, असे याहूने म्हटले आहे. ई-मेल चोरणाऱ्यांचा लवकरच शोध घेण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.