सौदी अरेबियाचे प्रदीर्घ काळ तेलमंत्री राहिलेले अहमद झाकी यामानी यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. अरब जगताने ऊर्जा साधनांवर नियंत्रण ठेवण्याच्या धोरणाचे ते १९७० मध्ये शिल्पकार ठरले होते. त्याच काळात तेलाचा पेचप्रसंग जगाने अनुभवला होता. इंधन किमती, इंधन उत्पादन हे दोन्ही घटक आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकू शकतात हे त्यांनी दाखवून दिले होते.
सौदी अरेबियाच्या दूरचित्रवाणीने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले असून निधनाचे कारण समजलेले नाही. त्यांचा दफनविधी मक्केत करण्यात येणार असल्याचे समजते. पाश्चिमात्य उद्योग जगतातील लोकांप्रमाणे त्यांचा पेहराव असे. ते अत्यंत मृदुभाषी पण कर्तव्य कठोर होते. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिग कंट्रीज म्हणजे ओपेक या संघटनेवर सौदी अरेबियाचे वर्चस्व ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. या गटात सौदी अरेबियाचे पारडेच नेहमी जड राहिले. तेलाच्या पिंपाच्या किमती या सौदी अरेबियाच्या मतावर ठरत असत.
जागतिक तेल उद्योग, राजकीय नेते. वरिष्ठ अधिकारी व पत्रकार यांच्यासाठी ते तेलाचे महत्त्व असलेल्या नव्या जगाचे प्रतिनिधी होते, असे तेल उद्योगावरील लेखक डॅनियल येरगिन यांनी म्हटले आहे.
यामानी हे १९६२ मध्ये पहिल्यांदा तेलमंत्री झाले. नंतर ते १९८६ पर्यंत या पदावर राहिले. ओपेकच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. जागतिक तेल बाजारपेठेवर सौदी अरेबियाची पकड निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. ओपेकवरील ते सौदी अरेबियाचे पहिले प्रतिनिधी होते. त्यांची तेलाच्या धोरणाबाबत वाटाघाटींची पद्धत शांत व संयमी होती. तीच पुढच्या मंत्र्यांनी अनुसरली.
१९७३ मध्ये पश्चिम आशियात ईजिप्त, सीरिया व मित्र देशांनी इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा जागतिक ऊर्जा बाजारपेठेत उलथापालथ झाली. ओपेकने तेलाचा पुरवठा पाच टक्के कमी केला. त्यामुळे अमेरिकेत इंधनाचे दर ४० टक्के वाढले होते. आरमको कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात त्यांचा पुढाकार होता. १९८६ मध्ये सौदी राजे फहद यांनी त्यांना एका वक्तव्यामुळे बडतर्फ केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 12:00 am