अर्थव्यवस्थेच्या अधोगतीवरून मोदी सरकारला धारेवर धरणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे महाभारतातील शल्याची उपमा दिली होती. अर्थकारणाच्या या लढाईत काहीजण सरकारला हिणवून निराशा वाढेल, अशी विधाने करत आहेत. महाभारतात कर्णाचा सारथी असलेल्या शल्याने हेच केले होते, असे सांगत मोदींनी सिन्हा यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. मोदींच्या या टीकेला सिन्हा यांनीही अप्रत्यक्षपणेच उत्तर दिले. ते काल दिल्लीत काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी बोलत होते. यावेळी सिन्हा यांनी उपस्थितांना संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच भीती आणि लोकशाही या गोष्टी एकत्र नांदू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

गेल्या दोन दिवसांपासून महाभारताचा विषय चर्चेत असून अनेक पात्रांचा उल्लेख ऐकायला मिळत आहे. काहीजणांनी शल्याचा उल्लेख केला. त्यांना शल्याबाबत कितपत ज्ञान आहे, हे मला माहिती नाही. मात्र, मला या ठिकाणी १०० कौरवांपैकी दोन महत्त्वाच्या पात्रांचा उल्लेख करावासा वाटतो, ती म्हणजे दुर्योधन आणि दु:शासन. सिन्हा यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर यशवंत सिन्हा यांनी अधिक थेट बोलणे टाळले. मात्र, त्यांनी लोकशाहीबाबत व्यक्त केलेली मते भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. लोकशाही म्हणजे केवळ संख्याबळ नव्हे, असे त्यांनी सांगितले. सर्वानुमत हा लोकशाहीचा आत्मा आहे. तुमच्याकडे बहुमत असले तरी तुम्ही इतर पक्षाच्या लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याबरोबर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी सिन्हा यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर यांच्या आठवणींना उजाळा देताना या दोन नेत्यांनी राजकारणात नैतिकतेचे मापदंड घालून दिल्याचे सांगितले. त्यांनी कधीच ‘अमुक-मुक्त’ किंवा ‘तमुक-मुक्त’ अशी भाषा केली नाही. कारण आपण सर्वजण लोकशाही प्रक्रियेचा भाग आहोत व संवाद, चर्चा आणि त्यावर आधारित उत्क्रांती हाच लोकशाहीचा खरा अर्थ असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.